काळा पैसा घोषित करण्याच्या योजनेच्या (आयडीएस) पहिल्या तिमाहीत देशातील ६२,२७५ व्यक्तींनी आपले उत्त्पन्न जाहीर केले असून या माध्यमातून ६५, २५० कोटींचा काळा पैसा उघड झाल्याची  माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली. ते शनिवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आयडीएस योजनेच्या माध्यमातून उघड झालेल्या काळा पैशासंदर्भातील तपशील जाहीर केला. मूल्यमापन झाल्यानंतर आगामी काळात हा आकडा वाढणार असून उत्त्पन्न जाहीर करणाऱ्या व्यक्तींची ओळख गुप्त राखली जाणार असल्याचेही जेटलींनी स्पष्ट केले. ३० सप्टेंबर ही काळा पैसा घोषित करण्याच्या योजनेची अंतिम मुदत होती. त्यानंतर आज सरकारकडून पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती देण्यात आली.
सरकारने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काळा पैसा शोधून काढण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. एचएसबीसीच्या यादीतून ८००० कोटींच्या रकमेचे मूल्यमापन झाले आहे. याशिवाय, छापेमारीतून ५६,३७८ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे. प्रत्येक करदात्याने सरासरी एक कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न जाहीर केल्याचे जेटलींनी सांगितले. अरूण जेटली यांनी यावर्षी सुरूवातीलाच ही योजना जाहीर केली होती. देशात दडलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी त्यांनी ही योजना सुरू केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Black money worth rs 65250 cr declared under income tax disclosure scheme arun jaitley
First published on: 01-10-2016 at 17:21 IST