इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि रुपयाचे विनिमय मूल्य या दोन्ही हवाई कंपन्यांच्या नियंत्रण नसलेल्या गोष्टींपायी नजीकचा काळ हा भारताच्या हवाई क्षेत्रासाठी आव्हानात्मक असला, तरी भविष्यातील उज्ज्वल कामगिरीबाबत आपल्याला दांडग्या आशा आहेत, असे प्रतिपादन बोइंगचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश केसकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
बोइंग या अमेरिकी विमाननिर्मात्या कंपनीचे ७३७ मॅक्स आणि सर्वाधिक इंधन किफायती विमान म्हणून दावा करण्यात आलेल्या ७७७ एक्स या आगामी वाणिज्य विमानांच्या नव्या श्रेणींची डॉ. केसकर यांनी येथे पत्रकारांना माहिती दिली. भारतात एअर इंडियासह, स्पाइस जेट आणि जेट एअरवेज हे या नव्या विमानांचे संभाव्य ग्राहक असतील आणि त्यासंबंधाने बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचे केसकर यांनी स्पष्ट केले; तथापि भारतात ना-हरकत प्रमाणपत्र मिळविलेल्या एअर-एशियाकडून मागणीचा प्रश्नच उद्भवत नाही, परंतु टाटा समूहाच्या अन्य भागीदारी म्हणजे टाटा-सिंगापूर एअरलाइन्सशी सख्य जुळू शकेल, असे त्यांनी सांगितले.
भारताच्या हवाई क्षेत्रातील सद्य स्थित्यंतरावरही भाष्य करताना डॉ. केसकर म्हणाले की, एअर-एशिया आणि टाटा-सिंगापूर एअरलाइन्स सामंजस्यातून या क्षेत्रात नवनवीन स्पर्धक येणे हे या बाजारपेठेतील उत्साहाला खतपाणी घालणारेच ठरेल. लोकांची हवाई प्रवासाबाबत मागणी वाढत आहे आणि २०२० सालासाठी भारताविषयी केलेले १४५० विमाने आणि १७५ अब्ज अमेरिकी डॉलर उलाढालीच्या भाकितावर आपण ठाम आहोत, असेही त्यांनी सांगितले. ७८७ या ‘ड्रिमलायनर’ म्हणून संबोधल्या गेलेल्या विमानाची ७८७-९ आणि ७८७-१० ही नवीन अद्ययावत रूपांच्या वैशिष्टय़ांची त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.