तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीचा भडका, रुपयाच्या घसरणीने..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशांतर्गत कंपन्यांच्या तिमाही निकाल हंगामाची बरी-वाईट सुरुवात आणि खनिज तेलाने प्रति पिंप ७४ डॉलपर्यंत गाठलेली पातळी याचा भांडवली बाजाराच्या सप्ताहारंभी व्यवहारांवर गंभीर नकारात्मक परिणाम दिसून आला. परिणामी, ‘सेन्सेक्स’ने ४९५.१० अंशांनी गडगडून, आपली शिखर पातळी आणि ३९,००० स्तरही सोडला. ‘निफ्टी’ने १५८ अंशांच्या घसरणीसह ११,६००ची महत्त्वपूर्ण पातळी गमावली.

अमेरिकेने इराणमधून तेल आयातीवर र्निबधांना दिलेली शिथिलता लवकरच संपुष्टात आणली जाण्याचे दिलेल्या संकेतांनी अर्थव्यवस्थेविषयक चिंतांनी भांडवली बाजाराला घेरलेले सोमवारी दिसून आले. येत्या २ मेपासून इराणवर संपूर्ण तेल-निर्यातबंदी लागू होईल, असा अमेरिकेचा इशारा आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती पुन्हा प्रति पिंप ७४ डॉलरपेक्षा वरच्या पातळीवर पोहोचल्या. भारतासारख्या आयात तेलावर सर्वस्वी मदार असलेल्या देशासाठी तेलाच्या किमतीतील भडका वित्तीय तुटीत वाढ करणारा आणि चलनाच्या मूल्यावरही विपरीत परिणाम करणारा ठरेल. त्यातच स्थानिक चलनाचे प्रति अमेरिकी डॉलर विनिमय मूल्यही ७०च्या वेशीवर पोहचले. या सर्व नकारात्मक घटकांनी बाजारात गेले काही दिवस सुरू असलेल्या भरधाव तेजीच्या उत्साहाचा घात केला.

मागील गुरुवारी बाजारातील शेवटचे व्यवहार संपुष्टात आल्यावर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे तिमाही निकाल जाहीर झाले. कंपनीने विक्रमी तिमाही नफा नोंदविला असला, तरी पारंपरिक पेट्रोलियम व्यवसायाच्या निराशाजनक कामगिरीने गुंतवणूकदारांच्या भावनांना आघात पोहचवल्याचे दिसून आले. शुक्रवारी ‘गुड फ्रायडे’निमित्ताने सार्वजनिक सुटी असल्याने बाजारात व्यवहार झाले नाहीत. त्यामुळे सोमवारच्या व्यवहारात या निकालांवर गुंतवणूकदारांनी प्रतिक्रिया दिली. निर्देशांकांमध्ये वजनदार स्थान असलेल्या या रिलायन्स समभागात पावणेतीन टक्क्यांच्या घसरणीची ही नकारार्थी प्रतिक्रिया राहिली. सेन्सेक्सच्या मोठय़ा घसरणीत या समभागाचेच सर्वाधिक योगदान राहिले. त्याखालोखाल येस बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आणि अ‍ॅक्सिस बँक या वित्तीय समभागांमधील मोठय़ा घसरणीचाही वाटा राहिला. त्या उलट टीसीएस, इन्फोसिस, एनटीपीसी आणि पॉवरग्रिड हे समभाग मूल्यवृद्धी करणारे राहिले. आशियाई भांडवली बाजारात एकंदरीत निराशेचे वातावरण होते. चीनचा शांघाई निर्देशांक १.७० टक्के गडगडला. युरोपीय बाजार मात्र ‘ईस्टर मंडे’निमित्ताने सुटी असल्याने बंद होते.

रुपया ३२ पैसे गडगडला

खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती भडकल्याच्या परिणामी, सोमवारी आंतरबँक चलन बाजारातील व्यवहारही प्रभावित झाल्याचे दिसून आले. स्थानिक चलन अर्थात रुपया हे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ३२ पैशांनी गडगडून ६९.६७ या दोन आठवडय़ांपूर्वीच्या नीचांकावर लोळण घेताना दिसून आले. दिवसांतील व्यवहारात रुपयाचे मूल्य ७० च्या वेशीवर म्हणजे ६९.८८ पर्यंत गडगडले होते. भांडवली बाजारात गुंतवणूकदारांच्या नफावसुलीसाठी झालेल्या समभागांच्या विक्रीनेही रुपयाच्या मूल्यावर गंभीर ताण आणला.

Web Title: Bse nse nifty sensex
First published on: 23-04-2019 at 02:17 IST