संवत्सर २०६९ची अखेर समीप येत असतानाच सेन्सेक्स  नवी ऐतिहासिक मजल मारत दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. सलग दुसऱ्या व्यवहारात भांडवली बाजारातील तेजी कायम राहिल्याने मुंबई निर्देशांकाने गुरुवारी नवा सर्वोच्च टप्पा गाठला. व्यवहाराच्या अखेरच्या क्षणी बँक, गृहोपयोगी वस्तू, सार्वजनिक कंपनी समभागांची जोरदार खरेदी नोंदली गेल्याने प्रमुख भांडवली बाजार १३०.५५ अंश वाढीसह २१,१६४.५२ वर पोहोचला. ६,३००ला गवसणी घालणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर ४७.४५ अंश वाढीसह ६,२९९.१५ वर स्थिरावला.
बुधवारी तब्बल तीन वर्षांनंतर ऐतिहासिक उच्चांकाला गवसणी घालणारा सेन्सेक्स गुरुवारी व्यवहाराच्या सुरुवातीलाही तेजीत होता. दिवसअखेर त्यातील गती अधिक वृद्धिंगत झाली. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स त्याच्या व्यवहारातील २१,२०५.४४ या आतापर्यंतच्या सर्वोच्च टप्प्यानजीक पोहोचला होता. या वेळी निर्देशांक बाजारात गुरुवारी रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, टाटा स्टील, गेल इंडिया, टाटा पॉवर यांनी निर्देशांक वधारणेत मोलाची कामगिरी बजावली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आरोग्य निगा वगळता इतर सर्व तेजीत होते.
रिझव्र्ह बँकेच्या दुसऱ्या तिमाहीतील व्याजदर वाढीच्या निर्णयावर सलग तीन व्यवहारांत सेन्सेक्सने ५९४.२४ अंश भर घातली आहे. पैकी दोन व्यवहारांत त्याने विक्रमी टप्पा गाठला आहे. तर एकूण ऑक्टोबर महिन्यात सेन्सेक्स १,७८४.७५ अंशांनी वधारला आहे. भांडवली बाजारात गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचा अखेरचा दिवस होता. मुंबई निर्देशांकाने व्यवहारात २१,२०६.७७ असा सर्वोच्च स्तर १० जानेवारी २००८ रोजी गाठला आहे.
निफ्टी गुरुवारी ६,३०० चा स्तर पार करताना ६,३०९.०५ पर्यंत पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या या प्रमुख निर्देशांकाने ५ नोव्हेंबर २०१० रोजी ६,३१२.४५ असा सर्वोच्च टप्पा गाठला आहे. दरम्यान, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची भांडवली बाजाराची खरेदी सलग १९व्या व्यवहारातही राहिली. या कालावधीत त्यांनी १,०१६.७७ कोटी रुपये गुंतविले.
सेन्सेक्सचा नवा विक्रमी टप्पा आणि निफ्टीचा ६,३०० नजीकचा प्रवास यामुळे प्रमुख भांडवली बाजाराच्या दिवसातील उलाढालीनेही ऐतिहासिक क्रम राखला आहे. मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारांची मिळून उलाढालदेखील गुरुवारी ५.३३ लाख कोटी रुपयांपुढे गेली. परिणामी गुंतवणूकदारांची मालमत्ताही आता विक्रमानजीक पोहोचली आहे. गुरुवारी गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत ६४ हजार कोटींची भर पडत ती ६८,४४,७७४ कोटी रुपये झाली. ५ नोव्हेंबर २०१० रोजी ती ७७,२८,६०० लाख कोटी रुपये अशी सर्वोच्च होती.