गेल्या दोन्ही आठवडय़ात सलग चार सत्रात तेजीत राहणारा सेन्सेक्स २८ हजाराला स्पर्श करण्याच्या अंतरापासून काहीसाच दुरावला होता. मात्र, बुधवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने व्यवहार सुरू होताच २८ हजारांचा आकडा पार केला. सुमारे १०० अंकांची भरारी घेत सेन्सेक्सने आजवरचा विक्रमी टप्पा पार करत आजवरची सर्वोच्च पातळी गाठली आहे. गुंतवणूकदारांनी आयसीआसीआय बँक, टीसीएस आणि सन फार्मा या बड्या कंपन्यांच्या शेअर्सना प्राधान्य दिल्याने, बाजारात आलेल्या तेजीमुळे सेन्सेक्सने नवा उच्चांक गाठला. 

गेल्या आठवडय़ात सलग चार व्यवहारात सेन्सेक्स वधारला होता. तत्पूर्वीच्या आठवडय़ातही अशीच कामगिरी मुंबई निर्देशांकाने बजाविली होती. त्यामुळे चार सत्रातील त्याची झेप दोन्हीवेळा १,००० अंशांची राहिली होती.

नव्या आठवडय़ाची सुरुवात करतानाही सेन्सेक्ससह निफ्टी तेजीच्या वाटेवर रुढ झाले होते. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रतिसाद यावेळी समभाग मूल्यांच्या तेजीवर उमटत होता. तसेच स्थावर मालमत्ता, सार्वजनिक बँकांच्या समभागांना असलेल्या मागणीने एकूणच उत्साह होता.