भांडवली बाजाराच्या निर्देशांकांनी सलग दुसऱ्या व्यवहारात ऐतिहासिक टप्प्यांवर स्वारी बुधवारीही कायम राखली. सलग पाचव्या सत्रातील तेजीमुळे सेन्सेक्स २८,८८८.८६ वर तर निफ्टी ८,७२९.५० वर पोहोचले आहेत. सेन्सेक्स व निफ्टीमध्ये बुधवारी अनुक्रमे १०४.१९ व ३३.९० अंश भर पडली आहे. सत्रात सेन्सेक्स २८,९५८ तर निफ्टी ८,७४१ पर्यंत पोहोचला होता. आता गेल्या पाच सत्रांतील मुंबई निर्देशांकाची वाढ १,५४२.०४ अंश राहिली आहे.
शेअर बाजाराच्या उत्साहास केंद्रीय अर्थसंकल्पाचे वेळापत्रक निमित्त ठरले. २३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक सुधारणांना वेग देणारे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांनी बाजारातील व्यवहार करताना व्यक्त केली. त्याचबरोबर अर्थसुधाराच्या आशेवर बाजारातील अधिकतर समभागांचे मूल्य वाढते राहिले. ग्राहकोपयोगी वस्तू, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदी अनुभवली गेली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या आगामी महिन्यातील पतधोरणाच्या पाश्र्वभूमीवर व्याजदर कपातीची आशाही व्यवहारात निर्माण झाली.
सेन्सेक्समध्ये हिंदुस्तान यूनिलिव्हर सर्वाधिक, ४.९९ टक्क्यासह वाढला. तर याच निर्देशांकातील भारती एअरटेल, एचडीएफसी, स्टेट बँक, हीरो मोटोकॉर्प, सन फार्मा, बजाज ऑटो, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, टाटा पॉवर, डॉ. रेड्डीज, मारुती सुझुकी, कोल इंडिया, इन्फोसिसचे मूल्य ३.९६ टक्क्यांपर्यंत उंचावले. प्रमुख निर्देशांकातील १८ समभागांना मागणी राहिली. तर तेजीतही आयटीसी, स्पाइसजेटसारख्या समभागांना आपटी अनुभवावी लागली. एकूण बाजारात तेजी असूनही किरकोळ गुंतवणूकदारांनी नफेखोरी अवलंबिल्याचे मिड कॅप व स्मॉल कॅपमधील प्रत्येकी ०.२४ व ०.२० टक्के घसरणीतून सिद्ध झाले.e01विमानतळाकडून नवी थकीत मागणी आल्याने स्पाइसजेटचा समभाग बुधवारी ८ टक्क्यांपर्यंत आपटत २१.१० रुपयांवर स्थिरावला. तर गेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यातील १० टक्के वाढ राखूनही आयटीसीचा समभाग सत्रअखेर ५ टक्क्य़ांनी घसरत ३५२ रुपयांवर आला. घसरणाऱ्या समभागांमध्ये कंपनीच्या समभागाला अधिक नुकसान सोसावे लागले. तिमाही नफ्यातील १६ टक्के घसरण नोंदविणाऱ्या टाटा समूहातील रॅलीज इंडियाचा समभाग ५.५ टक्क्यांनी खाली येत २१६ रुपयांपर्यंत बंद झाला.

अर्थसंकल्प दिनी शनिवारीही बाजार सुरू राहणार?
मुंबई : शनिवारचा दिवस असूनही भांडवली बाजाराचे व्यवहार येत्या २८ फेब्रुवारीला सुरू राहण्याची शक्यता आहे. २८ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. हा दिवस शनिवारी येत असल्याने या दिवशी भांडवली बाजाराचे व्यवहार होणे अपेक्षित नाही. मात्र यंदा सुटीच्या दिवशीच अर्थसंकल्प सादर होणार असल्याने बाजारही सुरू ठेवण्याच्या दिशेने हालचाल सुरू आहे. याबाबत मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजाराची सेबी या भांडवली बाजार नियामकाबरोबर चर्चा सुरू आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही बाजारातील सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी १० जुलै रोजी अर्थसंकल्प सादर झाल्यापासून सेन्सेक्सने आतापर्यंत १५ टक्के झेप घेतली आहे, तर यापूर्वीच्या २२ पैकी ११ अर्थसंकल्प सादर दिनी सेन्सेक्स वाढीसह बंद झाला आहे.