सलग तिसऱ्या सत्रातील तेजीने सेन्सेक्स २८८००, तर निफ्टी ८७०० पल्याड गेला. गुरुवारी सायंकाळी  किरकोळ महागाई दर व औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीबाबत सकारात्मकता ठेवत गुंतवणूकदारांनी केलेल्या व्यवहारात दोन्ही निर्देशांकांनी एक टक्क्य़ांच्या जवळपास कमाई केली. ८४.१५ अंश वाढीसह निफ्टी निर्देशांक तांत्रिकदृष्टया लक्षणीय ८७०० पातळी पल्याड ८७११.५५ वर दिवसअखेर स्थिरावला.
गेल्या सलग दोन व्यवहारांत वाढ नोंदविल्यानंतर मुंबई शेअर बाजाराची सुरुवात २८६५०.२५ वरील तेजीने झाली. सत्रात सेन्सेक्स २८८३८.५२ पर्यंत झेपावला. मध्यंतरात त्याने २८५०० च्या खालचा सत्रातील तळही गाठला. मात्र दिवसअखेर पुन्हा तो उंचावला. आता गेल्या तीन व्यवहारांतील मुंबई निर्देशांकाची वाढ ५७७.७१ अंश झाली आहे. बाजार आता ६ फेब्रुवारीच्या टप्प्यावर आहे.e06गुरुवारी सायंकाळी उशिरा जाहीर होणाऱ्या महागाई व औद्योगिक उत्पादन दराबाबत गुंतवणूकदारांनी आशावाद व्यक्त केला. परिणामी, भांडवली वस्तू, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान अशा साऱ्याच निर्देशांकातील समभागांना मागणी राहिली. क्षेत्रीय निर्देशांकामध्ये ऊर्जा सर्वाधिक २.५ टक्क्यांनी वाढला.
मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही अनुक्रमे १.१३ व १.२७ टक्क्यांनी वाढले.