सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने घरांसाठी कर्ज देणारी उपकंपनी ‘सेंट बँक होम फायनान्स’मधील आपल्या सर्व भागभांडवलाच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. १९९१ मध्ये स्थापित या कंपनीत बँकेचा ६० टक्के भांडवली हिस्सा आहे. सप्टेंबर तिमाहीतील चमकदार कामगिरीची घोषणा केल्यानंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
सेंट्रल बँकेने जुलै-सप्टेंबर २०१४ तिमाहीत तोटय़ातून नफा दर्शविणारी आर्थिक कामगिरी केली आहे. या तिमाहीत बँकेने १०३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. गेल्या वर्षी याच तिमाहीत मात्र बँकेला १,५०९ कोटींचा तोटा झाला होता. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी, मूलभूत व्यवसायाचा घटक नसलेल्या इतर व्यवसायातून बाहेर पडावे, अशा केंद्र सरकारने नव्या निर्देशांनुसार, ‘सेंट बँक होम फायनान्स’मधील संपूर्ण भागभांडवल विकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सेंट्रल बँकेचे कार्यकारी संचालक आर. के. गोयल यांनी सांगितले. संभाव्य खरेदीदाराशी बोलणी सुरू असून योग्य ती किंमत मिळाल्यास निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सेंट्रल बँकेने आयएल अ‍ॅण्ड एफएस या पायाभूत क्षेत्राला अर्थसाहाय्य पुरविणाऱ्या बिगर-बँकिंग कंपनीतील ८.३४ टक्केभांडवली हिस्सा विकण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. एसबीआय कॅप्स या प्रकरणी र्मचट बँकर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, या हिस्सा विक्रीतून ९०० कोटी रुपये मिळणे बँकेला अपेक्षित आहे.
चालू आर्थिक वर्षांत ‘सेंट्रल बँके’ला साधारण २००० कोटी रुपयांच्या अतिरिक्त भांडवलाची गरज असल्याचे बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव ऋषी यांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये बँकेने आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीला ७.१० कोटी समभागांची विक्री करून ५८२ कोटी रुपये उभे केले आहेत. सरकारकडून भांडवली पुनर्भरण हे ५०० कोटी रुपयांच्या आसपास होणे अपेक्षित आहे. तर उर्वरित १००० कोटी रुपये उभारण्यासाठी वेगवेगळे पर्याय आजमावले जातील, असे ऋषी यांनी सांगितले.

मार्चपर्यंत आणखी ५० दालनांच्या विस्ताराचे ‘मायडेन्टिस्ट’चे नियोजन
मुंबई: पुण्या-मुंबईनंतर गुजरातमध्ये पाय रोवणारी देशातील सर्वात मोठी दंतचिकित्सालयांची शृंखला ‘मायडेन्टिस्ट’ने अहमदाबादमध्ये अलीकडेच आपल्या १०० व्या दालनाचे उद्घाटन केले. आर्थिक वर्ष संपेपर्यंत म्हणजे मार्च २०१५ पर्यंत आणखी ५० दालनांची आपल्या शंृखलेत भर घालण्याचे नियोजन असल्याचे मायडेन्टिस्टचे मुख्याधिकारी विक्रम व्होरा यांनी सांगितले. अहमदाबाद, गांधीनगरमध्ये १५ कोटींची आणखी ३० दालने सुरू केली जातील. ज्यातून २०० दंतवैद्यक व अन्य ३०० व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

मुंबई सहकारी बोर्डातर्फे ‘सहकार सप्ताहा’चे आयोजन
मुंबई : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या ९७ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून मुंबई सहकारी बोर्डाने १३ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर असा सहकार सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. सहकारातून महिला, युवक आणि दुर्बल घटकांचे सबलीकरण, सहकारी विपणन, ग्राहक मूल्यवर्धन, ब्रॅण्डिंगच्या माध्यमातून सहकाराची ओळख, सहकारी संस्था आणि वित्तीय सर्वसमावेशकता, चांगल्या राहणीमानासाठी सहकारिता आणि सहकार आणि सहभागीदारी, असा या सप्ताहाचा प्रत्येक दिवस वरील विषयांना समर्पित करून, परिसंवाद व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आल्याचे मुंबई सहकारी बोर्डाचे अध्यक्ष अशोक गोंदुकुपे यांनी सांगितले. बोर्डाचे उपाध्यक्ष अजय ओरपे, मानद सचिव डी. आर. पाटील, सह-सचिव चंद्रकांत वंजारी, विशेष कार्याधिकारी पी. बी. निकम यांच्यासह राज्याचे सहकार राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी या विषयांवर सभासदांचे मार्गदर्शन करतील