संथ गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेला आवेग प्रदान करण्यासाठी चीनची मध्यवर्ती बँक- ‘पीपल्स बँक ऑफ चायना’ने रेपो दरात (ज्या दराने मध्यवर्ती बँकेकडून वाणिज्य बँकांना अल्पमुदतीचे कर्ज दिले जाते तो दर) २०१२ नंतर प्रथमच कपात शुक्रवारी केली. शिवाय वाणिज्य बँकांचे त्या प्रमाणात कर्जासाठीचे व्याज दर कमी होणार असले तरी त्यांना ठेवींवर व्याजाचे दर ठरविण्याची मुभा देण्यात आली आहे.
या आधी १८ ऑक्टोबर २०१२ रोजी पीपल्स बँक ऑफ चायनाने रेपो दरात कपात केली होती. मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर झेहू जिंगचोन यांनी केलेल्या ताज्या ०.४० टक्के दर कपातीने सर्वानाच चकित केले आहे. या कपातीनंतर वाणिज्य बँकांना उपलब्ध होणाऱ्या अल्पमुदतीच्या कर्जाचे दर हे  ५.६ टक्क्यांवर येतील. तर त्यांच्याकडून येणाऱ्या ठेवींच्या दरात पाव टक्क्यांची (०.२५%) कपात करण्यात आली आहे.
मागील आठवडय़ात जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार चीनचे ऑक्टोबर महिन्याचे औद्योगिक उत्पादन ७.३ टक्के दराने वाढले. सरकारने लक्ष्य ठेवलेल्या ७.५ टक्क्यांच्या दरापेक्षा तो कमी राहिला आणि दुसरीकडे उद्योगक्षेत्रातून बँकांकडून कर्जाची मागणीही मंदावलेली दिसून येत आहे. तरीही मध्यवर्ती बँकेच्या पतधोरणात व्याजाचे दर स्थिर राहतील अशीच बहुसंख्य अर्थतज्ज्ञ अपेक्षा व्यक्त करीत होते.
भांडवली बाजाराला उत्साहाचे भरते
चीनच्या व्याज दर कपातीच्या घोषणनेनंतर जागतिक स्तरावर भांडवली बाजारात उत्साहाचे भरते आले. शनिवारपासून लागू होणाऱ्या या दर कपातीने जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या प्रयत्नाचे युरोपातील शेअर बाजारांनी स्वागत केले. युरोपातील वाहन निर्मात्यांची चीन ही मुख्य बाजारपेठ असून, या दर कपातीचे तेथील कंपन्याच लाभार्थी ठरतील. त्यामुळे जर्मन, इटली व ब्रिटनमधील वाहन निर्मात्या कंपन्यांचे समभाग वधारले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

    

Web Title: China pboc cuts repo rate
First published on: 22-11-2014 at 04:19 IST