नवी दिल्ली : सरलीकृत कर व्यवस्था आणि किफायतीशीर कर दरामुळे चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते जुलै कालावधीत कंपनी कर संकलनात ३४ टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने शनिवारी दिली. करापोटी मिळणारे उत्पन्न आणि खर्च यातील तफावत रुंदावत जाऊन, तुटीचा प्रचंड ताण असलेल्या केंद्र सरकारच्या तिजोरीसाठी हा मोठा दिलासा आहे.

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये (एप्रिल २०२१ ते मार्च २०२२) कंपनी कर संकलन ७.२३ लाख कोटी रुपये होते. जे त्याआधीच्या आर्थिक वर्षांतील (२०२०-२१) कर संकलनापेक्षा ५८ टक्क्यांनी अधिक होते. तर यंदा चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या चार महिन्यांच्या कालावधीत आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील त्याच कालावधीची तुलना करता कंपनी कर संकलन ३४ टक्क्यांनी वाढले आहे. मात्र प्राप्तिकर विभागाकडून कर संकलनाची निश्चित आकडेवारी देण्यात आलेली नाही.

वाढलेले कर संकलन कंपन्यांच्या उत्पन्नातील वाढ, वाढती मागणी म्हणजे एकूणच अर्थव्यवस्थेची विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू असल्याचे निदर्शक आहे.

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीमुळे विशेषत: उद्योग क्षेत्रात सुधारलेले करविषयक अनुपालन, करप्रणालीचे डिजिटलीकरण त्याचप्रमाणे वेगवेगळय़ा सरकारी विभागांचे परस्पर आंतरजोडणी यातून एकूण करचोरीच्या प्रवृत्तीला आळा बसला असून, त्याचा परिणाम एकूण कंपनी कर संकलनात सुधारण्यात झाला    आहे.

तसेच भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांच्या उत्पन्नात जुलै तिमाहीत उत्साहवर्धक सुधारणा झाल्याने एकूण कंपनी कराच्या संकलनात वाढीचा परिणाम दिसून आला आहे.