ठेवी मोडून रोख्यातील गुंतवणुकीला पसंती
रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणानंतर व्यापारी बँकांनी ठेवींवरील व्याजदरात केलेली कपात व याच दरम्यान अव्वल पत असणाऱ्या व व्याज करमुक्त असलेल्या सरकारी कंपन्यांनी केलेली रोख्यांची विक्री यामुळे बँकांच्या ठेवी संकलनात ४०,००० कोटींची घट झाली आहे.
२ ऑक्टोबर ते २७ नोव्हेबर या कालावधीत ही घट झाल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेच्या बँकिंग सांख्यीकीत आढळून आले आहे. रिझव्‍‌र्ह बँक महिन्यातून दोन वेळा देशातील बँकांच्या ठेवी संकलन कर्ज वितरण व इतर तपशील असलेली सखोल आकडेवारी प्रसिद्ध करते.
या आकडेवारी नुसार 2 ऑक्टोबर रोजी संपलेल्या पंधरवडय़ात बँकांच्या ठेवीत तब्बल ४०,००० कोटींची घट झालेली बँकिंग विश्लेषकांना आढळून येत आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या या आकडेवारीनुसार या वर्षी ४१,४१० कोटींची घट झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत बँकांच्या ठेवी संकलनात ३९,६३० कोटींची वाढ झाली होती. बँकांच्या मुदत ठेवी हे व्याज दर संवेदनशील असल्याने एखाद्या बँकेने पाव टक्का ठेवींच्या दारात कपात केली तरी मुदतपूर्तीनंतर ठेवींचे नुतनीकरण होत नाही.
दीर्घकाल बँकांचे असलेले ठेवीदार पाव टक्क्यासाठी दुसऱ्या बँकांकडे वळल्याचा अनुभव या आधी बँकांना आल्याचे मत सारस्वत बँक व न्यु इंडिया या सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक पद भूषविलेले जेष्ठ बँकिंग तज्ज्ञ दिगंबर शिरोडकर यांनी व्यक्त केले.
अन्य गुंतवणूक साधनांची उपलब्धता असूनही परंपरागत ठेवी गुंतवणुकदार अजूनही बँकांच्या ठेवीत गुंतवणूक करतात. तर उच्च धनसंपदा बाळगणारे ठेवीदार सध्या बँकांच्या ठेवी मोडून करमुक्त रोख्यातून गुंतवणुका करीत असल्याचे आढळून येत असल्याचे एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने ‘लोकसत्ता’ला सांगितले.
‘आमच्या शाखेच्या ठेवी संकलनात ३० सप्टेंबर रोजी ६० कोटीचा टप्पा ओलांडला होता. मागील महिन्याभरात माझ्या शाखेच्या ठेवींत काही लाखांची घट झाली आहे. बहुसंख्य ठेवीदारांनी करमुक्त रोख्यातून गुंतवणूक करण्यासाठी आपल्या ठेवींचे नुतनीकरण न केल्याचे आढळल्याचे या शाखा व्यवस्थापकाने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असेही होत आहे..
करमुक्त रोख्यांच्या परताव्याचा दर सध्या बँकांच्या ठेवींवरील व्याजापेक्षा अधिक आहे. शिवाय हे रोखे शेअर बाजारात नोंदलेअसल्याने रोखे खरेदी केल्यापासून सुरवातीचे ३० दिवसांनंतर या रोख्यांना अव्वल रोकड सुलभता आसते. ३०% प्राप्तीकराच्या कक्षेत असणाऱ्या ठेवीदारांसाठी परताव्याचा दर ११.५५ टक्के असल्याने पारंपरागत मुदत ठेवी करणारे गुंतवणूकदार आज करमुक्त रोख्यांकडे वळत आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deposits collection of trader banks reduced
First published on: 22-12-2015 at 01:46 IST