मुंबई : सिमेंट आणि पोलादासह अन्य महत्त्वाच्या सामग्रीच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील स्थावर मालमत्ता विकसकांनी, कच्चा माल खरेदी करणे थांबविण्यासह, त्यांच्या सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांवरील बांधकाम बंद करण्याचा विचार करीत आहे. खासगी स्थावर मालमत्ता विकसकांची संघटना – क्रेडाईच्या महाराष्ट्रातील सर्व सभासदांनी सामूहिकपणे दिलेला हा इशारा आहे.

मालाच्या वाढत्या किमती व मेट्रो उपकर याचा थेट परिणाम गृह खरेदीदारांवर होणार आहे. परिणामी, लोकांना घर खरेदी करणे परवडणार नाही, तर बांधकाम व्यावसायिकांना घरे बांधणे परवडत नाही, अशी ही स्थिती असल्याचे क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनील फुरडे यांनी सांगितले. बांधकाम साहित्यापैकी महत्त्वाचा घटक असणाऱ्या स्टील, सिमेंट,  विटांचा दर, वाळू आणि वॉश सॅण्ड, विद्युत तारा, फिटिंग्स, टाइल्स, पाइप, सॅनिटरीवेअर, फॅब्रिकेशन, रेती, गौण खनिज, मुरूम, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मजुरी यात साधारणत: ४० टक्क्यांच्या घरात वाढ गेल्या दोन वर्षांत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

चालू प्रकल्प पूर्ण करण्याची अंतिम मुदत किमान सहा महिन्यांनी वाढविली जावी, अशी ‘महारेरा’कडेही विनंती करण्यात आली असून, जेणेकरून किमती वाजवी पातळीवर येईपर्यंत बांधकाम थांबवण्याची मुभा विकसकांना मिळेल, असे फुरडे यांनी स्पष्ट केले. ‘क्रेडाई महाराष्ट्र’चे विविध ६१ शहरस्तरीय संघटना आणि  एकूण ३,००० पेक्षा जास्त विकसक या संघटनांचे सदस्य आहेत.