किंगफिशर एअरलाईन्सवरील कर्जवसुलीबाबत मुख्य प्रवर्तक यूबी समूहाने धनको बँकांपुढे ठोस प्रस्ताव दिला असल्याचे समजते. समूहातील युनायटेड स्पिरिट्स या फायद्यातील कंपनीमधील ५३.४ टक्के हिस्सा ब्रिटिश मद्य कंपनी डिआजियोद्वारे खरेदी केले जाणार आहेत. या कंपनीला धनको बँकांकडे गहाण असलेल्या युनायटेड स्पिरिट्सचे समभाग परस्पर विकून कर्जवसुली करण्याची मुभा देण्याचा प्रस्ताव पुढे आणला गेला आहे.
तथापि अशा कोणताही प्रस्ताव घेऊन बँकांनी अद्याप आपल्याशी संपर्क साधला नसल्याचे डिआजियोने जारी केलेल्या पत्रकात खुलासा केला आहे. प्रत्यक्षात युनायटेड स्पिरिट्सबरोबरच्या व्यवहाराच्या पूर्ततेच्या प्रतीक्षेत ही कंपनी आहे. सेबीने नुकतीच या व्यवहाराच्या पूर्ततेला मुदतवाढ दिली आहे. २.१ अब्ज डॉलरचा हा व्यवहार होण्याची शक्यता असून त्यातील काही निधी किंगफिशरची देणी देण्यासाठी उपयोगी आणला जाऊ शकतो, असे आता संकेत मिळत आहेत.  यूबी समूह किंगफिशरच्या कर्जापोटी समूहातील अन्य कंपन्यांचे बँकांकडे गहाण असलेले समभाग विकण्याच्या शक्यतेचीही चाचपणीही करीत आहे.
सुमारे ७,००० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी बँका आता आणखी मुदत देण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्यामल आचार्य यांनी मंगळवारच्या मुंबईतील बैठकीनंतर स्पष्ट केले होते. गहाण समभाग, मालमत्ता याद्वारे प्राथमिक टप्प्यावर किमान ६,५०० कोटी रुपये वसुलीची शक्यताही त्यांनी त्यावेळी वर्तविली आहे. स्टेट बँकेची सर्वाधिक १,६०० कोटी रुपयांची देणी किंगफिशरकडे प्रलंबित आहे.
दरम्यान, कंपनीची देणी वसूल करण्यासाठी कसून तयारी करणाऱ्या बँकाद्वारे आपल्याला अद्याप कोणतीही नव्याने विचारणा झाली नसल्याचा दावा किंगफिशरने जारी केलेल्या पत्रकात केला आहे. चर्चा करण्यासाठी अद्याप कोणत्याही बँकेने बोलाविले नसल्याचेही कंपनीच्या प्रवक्त्याने या पत्रकात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diageo deal money will used to repay loan of kingfisher
First published on: 16-02-2013 at 12:55 IST