दसऱ्याच्या मुहूर्ताला म्हणजे ऑक्टोबर महिन्यात देशातील मोटरसायकलने तब्बल दीड दशकानंतर सर्वोत्तम विक्री नोंदविली आहे. या कालावधीत १८.०५% वाढ राखताना देशात मोटरसायकलची ११,०५,१०३ विक्री झाली आहे.
सण समारंभास खऱ्या अर्थाने सुरुवात होणाऱ्या याच कालावधीत प्रवासी कार क्षेत्राने मात्र ३.८८%नी रोडावली आहे. तत्पूर्वी सलग दोन महिन्यांत ती चढी राहिली होती.
‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स’ (सियाम) या वाहन उद्योग संघटनेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, १९९८ नंतर यंदाच्या ऑक्टोबरमधील मोटरसायकलची विक्री सर्वाधिक राहिली आहे.
बजाज ऑटो वगळता हीरो मोटोकॉर्प, होन्डा यांनी वाढ नोंदविली. दसरा ते दिवाळी दरम्यान सणांच्या कालावधीत होन्डाने ४.५६ लाख दुचाकी विकल्या. ही वाढ ७०% आहे. तर कंपनीच्या ड्रिम निओने एक लाखाच्या विक्रीचा टप्पा पदार्पणानंतर चार महिन्यांत पार केला आहे. एकटय़ा दसऱ्याच्या दिवशी कंपनीची एकूण दुचाकी विक्री ८० हजार झाली आहे. मोटरसायकलप्रमाणेच एकूण दुचाकी विक्रीही १८ टक्क्यांनी वाढली.  
प्रवासी कारची विक्री ऑक्टोबरमध्ये १,६३,१९९ राहिली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती १,६९,७८८ होती. वाढते इंधन दर आणि व्याजदर यामुळे महागाई वाढत असून खरेदीदारांकडून वाहनांना प्रतिसाद मिळत नसल्याचे संघटनेचे महासंचालक विष्णू माथुर यांनी म्हटले आहे. सलग नऊ महिने घसरण राखल्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रवासी वाहन विक्री वाढली होती. मात्र ऑक्टोबरमध्ये पुन्हा ती घसरली. या कालावधीत मारुती, टाटा मोटर्स, महिंद्र या कंपन्यांची कमी विक्री झाली. तर फोर्ड, निस्सान यांना अनुक्रमे इकोस्पोर्ट, डस्टर यांनी साथ दिली. एकूणच स्पोर्ट यूटिलिटी श्रेणीत ७%ची वाढ राखली गेली.