सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एअर इंडियाप्रमाणेच किंगफिशर एअरलाईन्स या खाजगी कंपनीलाही आर्थिक सहकार्य करावे, अशी अनोखी मागणी ‘अ‍ॅसोचेम’ या उद्योजकांच्या संघटनेने सरकारकडे केली आहे. खाजगी उद्योगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेचे सरचिटणीस बी. एस. रावत यांनी ही मागणी करून किंगफिशरला कर्जाच्या सापळ्यात अडकवणारे मुख्य प्रवर्तक विजय मल्ल्या यांची अप्रत्यक्षपणे तळी उचलून धरली आहे. याबाबत रावत यांचे म्हणणे असे की, भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि कर्मचारी भविष्य निधी संघटना सुमारे ७,४०० कोटी रुपयांचे रोखे खरेदी करून कर्ज संकटातील एअर इंडियासाठी धावून जात असतील तर किंगफिशरचीही आर्थिक स्थिती तशीच आहे; तेव्हा तिलाही सरकारी मदत होणे आवश्यक आहे. शिवाय हे सर्व संकट मागणी कमी झाल्यामुळे, हवाई इंधनाच्या वाढत्या किंमती तसेच इतर खर्च वधारल्यामुळे आले आहे, याकडेही रावत यांनी लक्ष वेधले.