देशातील पहिला कंपनी रोखे ईटीएफ सज्ज

उत्पादन बाजारात आणण्यामागे सरकारची तीन उद्दीष्टे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

गुंतवणूक संधी

भारताचा पहिला कंपनी रोखे ईटीएफ गुरुवारपासून (१२ डिसेंबर) गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. एडलविस म्युच्युअल फंड हे या रोखे ईटीएफचे व्यवस्थापन हाताळणार आहे. केंद्र सरकारच्या मालकीच्या निवडक ‘एएए’ पत असलेल्या कंपन्यांच्या रोख्यांमध्ये भारत बाँड ईटीएफ गुंतवणूक करेल. तीन आणि पाच वर्षे मुदत असलेल्या हा ईटीएफ गुंतवणूकदारांना अव्वल पत असलेल्या कंपन्यांच्या कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणुकीची संधी आहे.

हे उत्पादन बाजारात आणण्यामागे सरकारची तीन उद्दीष्टे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पहिले म्हणजे, केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्यांना त्यांची भांडवलाची निर्बंधज पूर्ण करणे. दुसरे, भारतीय रोखे बाजाराची रोकड सुलभता वाढविणे आणि तिसरे कारण किरकोळ गुंतवणूकदारांसाठी रोखे बाजाराचा मार्ग प्रशस्त करणे होय.

ईटीएफ हे नावानुसार एक्सचेंज ट्रेडेड फंड असून त्यांची भांडवली बाजारात नोंद होते आणि इच्छुक खरेदीदार या ईटीएफची युनिट खरेदी आणि विक्री करू शकतील. या ईटीएफचे दोन प्रकार असून एक ३ वर्ष मुदतीचा आणि दुसरा १० वर्षे मुदतीचा आहे. मुदतपूर्तीनंतर मुद्दल गुंतवणूकदारांना परत केले जातील. तीन वर्षे मुदतीच्या ईटीएफसाठी ३,००० कोटी रक्कम ठरविण्यात आली असून मागणी वाढल्यास २,००० कोटी अतिरिक्त उभारता येतील. १० वर्षे मुदतीच्या ईटीएफसाठी नधी उभारण्याची मर्यादा ४,००० कोटी असून मागणी वाढल्यास ६,००० कोटी अतिरिक्त उभारता येतील.

रोखे बाजार व्याज आणि मुद्दलाच्या परतफेडीच्या अनियमितता अनुभवत असताना उच्च दर्जाची पत धारण करणाऱ्या आणि अत्यंत अल्प व्यवस्थापन शुल्क असलेला भारत बाँड ईटीएफ हा गुंतवणूकदारांसाठी निश्चित उत्पन्न मिळविण्याचा एक चांगला पर्याय मानला जात आहे. ज्यांच्या गुंतवणुकीचा कालावधी उपलब्ध मुदतपूर्तीच्या कालावधीशी जुळतो त्यांच्यासाठी ही सुसंधी असल्याचे सांगितले जाते. परंतु १० वर्षे मुदतीचे ईटीएफ व्याजदर संवेदनशील असल्याने हे ईटीएफ अस्थिर असू शकतील. परंतु ५ ते ७ वर्षां नतर व्याजदर घसरलेले असल्याने हे रोखे परिपक्व  झाले असतील. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी प्राथमिक विक्री कालावधी १३ ते २० डिसेंबर असून इच्छुकांनी १,००० च्या युनिट आकारात गुंतवणूक करता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: First company in the country equipped with a bond etf akp

ताज्या बातम्या