पीटीआय, नवी दिल्ली : देशात सरलेल्या २०२१-२२ या आर्थिक वर्षांत थेट परकीय गुंतवणूकरूपात विक्रमी ८३.५७ अब्ज डॉलरचा ओघ आल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शुक्रवारी दिली. आधीच्या आर्थिक वर्षांत ८१.९७ अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक आली होती. थेट परदेशी गुंतवणूक धोरणात सुधारणा, गुंतवणुकीच्या वाढलेल्या संधी व सुविधा आणि व्यवसायसुलभता या आघाडीवर सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे विदेशातून गुंतवणुकीचा प्रवाह वाढला आहे. जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भारत हा प्राधान्य यादीत असल्याचे यातून स्पष्ट होते, असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

निर्मिती क्षेत्रामध्ये सर्वाधिक परदेशी गुंतवणूक आली आहे. सरलेल्या वर्षांत त्यात ७६ टक्क्यांची वाढ होऊन ती २१.३४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. आधीच्या वर्षांत ती १२.०९ अब्ज डॉलर अशी होती. आघाडीच्या गुंतवणूकदार देशांमध्ये सिंगापूर २७ टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ अमेरिका १८ टक्के, तर मॉरिशसचे थेट परकीय गुंतवणुकीत १६ टक्के योगदान राहिले आहे. क्षेत्रीय पातळीवर संगणक- सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, सेवा क्षेत्र आणि वाहननिर्मिती उद्योगांमध्ये सर्वाधिक परदेशी गुंतवणूक आली आहे.