रविवारी सकाळी ‘लोकसत्ता अर्थभान’चे चौथे सत्र

मुंबई : बँकेतील ठेवींपलीकडेही गुंतवणुकीचे अनेकविध पर्याय आहेत आणि आता ते अनेकांना चांगलेच परिचयाचेही झालेले आहेत. सोनेअडके, जमीनजुमला, बाँड्स – रोखे अथवा शेअर्स असू दे किंवा नव्या जमान्याला साजेसे क्रिप्टो, एनएफटी यांसारख्या डिजिटल मालमत्ता यांना पसंतीही मोठी आहे. या प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकीचे फायदे त्याचप्रमाणे पत्करावा लागणारा धोका मात्र लक्षात घेतला पाहिजे. त्याचाच वेध येत्या रविवार ‘लोकसत्ता अर्थभान’मधून घेतला जाणार आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थभान’ या अर्थसंकल्पानंतरच्या गुंतवणूकदार जागराच्या मालिकेतील चौथ्या सत्रात ‘गुंतवणुकीच्या नव्या वाटा’ या विषयावर चर्चा होणार आहे. हा दूरचित्रसंवाद माध्यमातून होणारा कार्यक्रम येत्या रविवारी, २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. गुंतवणुकीमागील उद्दिष्ट, परताव्याच्या अपेक्षा, वयोमान आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेप्रमाणे सध्या उपलब्ध गुंतवणुकीच्या नवीन पर्यायांचा वेध आणि त्यातून नेमकी निवड कशाची करायची, यासंबंधीचे मार्गदर्शन लेखक आणि गुंतवणूकविषयक विश्लेषक वीरेंद्र ताटके हे करणार आहेत. तज्ज्ञ वक्त्यांना प्रश्न विचारून वाचकांना त्यांच्या शंकांचे निरसनही करून घेता येईल. 

तंत्रज्ञानाने लोकांच्या जीवनशैलीत बदल घडविलाच आहे. परंतु यातून गुंतवणुकीचे क्षितिजही रुंदावत गेले आहे. बँकांतील पारंपरिक एफडी, आरडी आणि पोस्टाच्या योजनांवरील परतावा हा घटत्या व्याजदरामुळे खूपच कमी झाला आहे. पण स्थिर स्वरूपाचे आणि निश्चित लाभाची हमी हेच पर्याय देतात.

त्या उलट बाँड्स, इक्विटी, डिजिटल गोल्ड हे स्थिर उत्पन्नाची हमी देत नसले, तरी तुलनेने खूप मोठय़ा परताव्याच्या शक्यताही मात्र निर्माण करतात. बिटकॉइनसारख्या कूटचलनाने तर गेल्या काही काळात डोळे दिपवणारी तेजी दाखविली आहे. तेजीच्या या दौडीमागील कारणे, तसेच सुरक्षितता, तरलता आणि करकार्यक्षम परतावा या अंगाने त्यांचे गुण-अवगुण याचे विश्लेषण ताटके या निमित्ताने करतील.

विषय :    गुंतवणुकीच्या    नव्या वाटा

वक्ते : वीरेंद्र ताटके

कधी : रविवार, २७ फेब्रुवारी

वेळ : सकाळी ११ वाजता

सहभागासाठी..

वाचकांना http:// tiny. cc/ LS_ Arthabhan_27 Feb या लिंकवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक ठरेल अथवा सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून नावनोंदणी करता येईल.