scorecardresearch

‘आयपीओ’मधून मेपर्यंत ४० हजार कोटींची निधी उभारणी

विद्यमान २०२२ सालात मे महिन्यापर्यंत १६ कंपन्यांनी भांडवली बाजारातून प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून ४०,३११ कोटींचा विक्रमी निधी उभारला.

ipo
संग्रहित छायाचित्र

मुंबई : विद्यमान २०२२ सालात मे महिन्यापर्यंत १६ कंपन्यांनी भांडवली बाजारातून प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून ४०,३११ कोटींचा विक्रमी निधी उभारला. गेल्या वर्षांत आयपीओच्या माध्यमातून विक्रमी निधी उभारणी करण्यात आली होती. तरी गेल्या वर्षी मे महिन्यापर्यंत १७,४९६ कोटींचा निधी उभारला गेला होता त्या तुलनेत यंदाच्या निधी उभारणीत ४३ टक्क्यांची वाढ झाली आहे. 

गुंतवणूकदारांसाठी निराशादायी ठरलेल्या बहुचर्चित भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) आयपीओचा यंदाच्या मेपर्यंतच्या निधी उभारणीत निम्म्याहून अधिक वाटा राहिला आहे. एकटय़ा एलआयसीने भांडवली बाजारातून २०,५०० कोटींचा निधी उभारला आहे. चालू वर्षांत भांडवली बाजारात सूचिबद्ध झालेल्या ३१ कंपन्यांपैकी २१ कंपन्यांनी पदार्पणालाच गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला. मात्र त्यापैकी १९ कंपन्यांचे समभाग सध्या गुंतवणूकदारांना प्रारंभिक समभाग विक्रीच्या वेळी दिलेल्या किमतीपेक्षा खालच्या किमतीवर व्यवहार करत आहेत.

भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ५२ कंपन्यांनी आयपीओच्या अनुषंगाने मसुदा प्रस्ताव (रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) दाखल केला आहे. २००७ नंतरचा हा उच्चांक आहे, त्या वर्षांत १२१ कंपन्यांनी भांडवली उभारणीसाठी प्रस्ताव सादर केला होता. भांडवली बाजाराच्या चालू कॅलेंडर वर्षांत मोठय़ा प्रमाणावर घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांकी पातळी गाठल्यानंतर त्यात १५ टक्क्यांची घसरण झाली आहे. बाजारातील परिस्थिती आव्हानात्मक झाल्याने कंपन्यांनी सावध भूमिका घेतल्याने आयपीओच्या माध्यमातून भांडवल उभारणीची संख्या कमी झाली आहे. वर्षांच्या पहिल्या चार महिन्यांत सरासरी प्रत्येक महिन्यात १० कंपन्यांचे आयपीओ बाजारात धडक देतात. मात्र यंदा मे आणि जूनमध्ये अनुक्रमे चार आणि सहा कंपन्यांनी भांडवली बाजारात नशीब अजमावले आहे.

कामगिरीच्या मोर्चावर:

भांडवली बाजारात चालू वर्षांत नव्याने सूचिबद्ध झालेल्या कंपन्यांपैकी केवळ अदानी विल्मरच्या समभागाने गुंतवणूकदारांना सर्वात सरस परतावा दिला आहे. हा समभाग सूचिबद्धतेपासून १५६ टक्क्यांनी वधारला आहे. या पाठोपाठ व्हरांडा लर्निग सोल्यूशन्सने ६५ टक्के, रेन्बो चिल्ड्रन ९ टक्के तर वेदान्त फॅशन्सने ८ टक्के परतावा दिला आहे. मात्र एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीज, एलआयसी, कॅम्पस अ‍ॅक्टिव्हवेअर, डेलिव्हरी, हरिओम पाइप आणि उमा एक्स्पोर्टने गुंतवणूकदारांच्या पदरी नुकसान टाकले आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fund raising ipo capital market companies till may ysh

ताज्या बातम्या