यापुढे तुम्ही मोठय़ा रकमेची सोनेखरेदी करीत असाल किंवा सोन्याच्या बदल्यात कर्ज उचलत असाल तर ‘पॅन’ देणे बंधनकारक ठरणार आहे. कच्च्या तेलाच्या आयातीनंतर देशाच्या विदेशी चलन गंगाजळीवरील सर्वात मोठे संकट ठरलेल्या सोने आयातीला कमी करण्याच्या दृष्टीने याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
सोने आयातीच्या विषयावरील रिझव्‍‌र्ह बँकेकडून स्थापित कार्यदलाचे अध्यक्ष के. यू. बी. राव यांनी नव्या शिफारशी सुचविल्या आहेत. बँकांमार्फत होणाऱ्या सोने खरेदी दरम्यान तसेच बिगर बँकिंग वित्तसंस्थेद्वारा दिल्या जाणाऱ्या तारण कर्जाच्या वेळी ग्राहकांकडून पॅन घेणे बंधनकारक करण्याची त्यांची शिफारस आहे. याचबरोबर मोठय़ा रकमेतील सोने खरेदीसाठी धनादेशानेच वेतन अदा करण्याविषयी तसेच सोन्याचा परताव्याशी निगडित बचत खाते सुरू करण्याविषयीही सुचविण्यात आले आहे.
चालू खात्यातील वाढत्या तुटीबाबत केंद्र सरकारबरोबरच रिझव्‍‌र्ह बँकेनेही चिंता व्यक्त केली आहे. याला अनुसरूनच आता सोने  खरेदीदार किंवा कर्जदारांना जरब म्हणून पॅन देणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव रिझव्‍‌र्ह बँकेच्या समितीने दिला आहे. डेप्युटी गव्हर्नरपदावरून नुकतेच निवृत्त झालेले सुबीर गोकर्ण यांनीही पुण्यातील ‘बँकॉन’ परिषदेत सोने आयातील आळा घालण्यासाठी सोन्याशी निगडित बँकिंग उत्पादने अस्तित्वात आणण्याची आवश्यकता मांडली होती.
बँकांच्या विविध शाखांमधून सध्या सोन्याची विविध वजनाची नाणी वितरित केली जातात. तर बिगर बँकिंग वित्तसंस्थ्यांच्या माध्यमातून सोने तारण ठेवून मोठय़ा प्रमाणात कर्ज पुरवठा केला जातो. सध्या ५ लाख रुपयांवरील दागिने खरेदीसाठी बंधनकारक असलेले पॅन आता बिगर बँकिंग वित्तसंस्थांना या रकमेच्या वित्त पुरवठय़ासाठीही बंधनकारक करण्यात यावे, असेही या समितीने सुचविले आहे.