सहकारी बँकांच्या लघुनाम आणि नव्या बोधचिन्ह क्षेत्रात आता आघाडीची जीपी पारसिक अर्थात गोपीनाथ पाटील जनता सहकारी बँकही उतरली आहे. त्याचबरोबर राजदूत नियुक्तीचे धोरणही बँकेने नुकतेच अवलंबिले. बँकेच्या राजदूतपदी प्रसिद्ध कलाकार दाम्पत्य उमेश कामत आणि प्रिया बापट यांची नियुक्ती झाली आहे. सहकार क्षेत्रातील आघाडीच्या या बँकेने बॅ्रण्ड अ‍ॅम्बेसेडर (राजदूत) नियुक्तीबरोबरच नाममुद्रेतही (ब्रॅण्ड) बदल केला आहे. गेल्या चार दशकांपासून अस्तित्वात असलेल्या या बँकेच्या ४२ शाखा असून १,८०० कोटी रुपयांची जमा रक्कम आहे. नवा गडी नवे राज्य हे नाटक आणि एका लग्नाची तिसरी गोष्ट या चित्रपटातील उमेश आणि प्रिया यांच्या भूमिका गाजल्या आहेत. बँकेने आपले बोधचिन्हही (लोगो) यानिमित्ताने अनावरित केले आहे. यावेळी बँकेचे रणजित पाटील हेही उपस्थित होते. आगामी प्रवासाबाबत त्यांनी सांगितले की, बँक २०१५ पर्यंत जमा ठेव रु. २,५०० कोटी, कर्ज रु. १,५०० कोटी तर एकूण मालमत्ता रु. ३३० कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट राखत आहे. बँकेने मार्च २०१३ अखेर २२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे.