युनियन बँकेकडून ६.४० टक्क्यांपर्यंत कपात

मुंबई : यंदाचा सणोत्सव  सर्वसामान्यांच्या स्वमालकीच्या घराच्या स्वप्नाची पूर्तता करणारा ठरावा, इतके बँका व वित्तसंस्थांनी घरांसाठी कर्ज स्वस्त केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँकेने सणोत्सवानिमित्त गृहकर्जाच्या व्याजदरात ६.४० टक्क्य़ापर्यंत कपात केली आहे. सध्या बँकांकडून उपलब्ध करण्यात आलेला घरासाठी कर्जाचा हा सर्वात स्वस्त व्याजदर आहे.

वेगवेगळ्या बँकांकडून अलीकडच्या काळात ६.५० टक्के दराने कर्ज देणाऱ्या योजना सणोत्सवाच्या मर्यादित काळासाठी आल्या आहेत. त्यांच्या तुलनेत युनियन बँकेकडून देण्यात येणाऱ्या गृह कर्जाचा दर सर्वात कमी ६.४० टक्के असा आहे. बँकेचा हा सुधारित दर बुधवारपासून (२७ ऑक्टोबर) लागू  झाले आहेत. नव्याने कर्ज घेणारे ग्राहक आणि इतर बँकांकडून कर्जाचे हस्तांतरण करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना या दराने कर्ज बँकेकडून उपलब्ध होणार आहे. कोटक महिंद्र बँक (६.५० टक्के), सारस्वत बँक (६.५० टक्के), पीएनबी (६.६० टक्के), आयसीआयसीआय बँक (६.७० टक्के),  स्टेट बँक (६.७० टक्के), बँक ऑफ बडोदा (६.७५ टक्के),  बँक ऑफ महाराष्ट्र (६.८० टक्के) असे अन्य बँकांचे घरांसाठी कर्जाचे व्याजदर आहेत.