अमेरिकी संस्था ‘मूडीज्’कडून भारताला सल्ला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेने र्निबध आणून कोंडी केलेल्या इराणकडून भारताने अंशत: अथवा पूर्णपणे खनिज तेलाची आयात बंदी करावी, अशी सूचना मूडीज या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेने केली आहे. मूडीज ही अमेरिकेचीच पतमानांकन संस्था आहे.

इराणमधून उत्पादित होणाऱ्या इंधनावर अमेरिकेने लागू केलेले र्निबध नोव्हेंबरपासून अस्तित्वात येणार आहेत. आखाती परिसरातील या देशाचा भारत हा चीननंतरचा दुसरा मोठा तेल खरेदीदार देश आहे. इराणमधून कमी इंधन आयात करण्याचा विचार करणाऱ्या भारताने इराणबरोबर नोव्हेंबरपासून युरोऐवजी रुपयांमध्ये व्यवहार करण्याचे निश्चित केले आहे.

भारताने इराणऐवजी आखाती भागातील सौदी अरब, इराकमधून खनिज तेल आयात करावे, असे नमूद करत मूडीजच्या गुंतवणूक सेवा शाखेने इराणवरील तेल-मदार कमी करण्याचा आग्रह धरला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील र्निबध ५ नोव्हेंबरपासून लागू होतील, असे जाहीर केले. इराणमधून इंधन आयात कमी करणाऱ्या अन्य देशांबरोबर अमेरिका सहकार्य करेल, अशी तयारीही ट्रम्प यांनी दाखविली. या र्निबधाबाबत अनुकूलता गृहित ट्रम्प यांनी भारताच्या गरीबी निर्मूलन कामगिरीचे आपल्या भाषणात कौतुकही केले.

भारताची ८० टक्के इंधन गरज विदेशातून आयात इंधनामार्फत भागविली जाते. पैकी ३० टक्के इंधन आयात पर्शियन आखाती राष्ट्रांमधून तर इराणमधून १४ टक्के इंधन आयात होते. तुलनेत चीन हा देश इराणमधून अधिक इंथन आयात करतो.

भारत इराणमधून कमी अथवा पूर्ण तेल आयात बंद करेल, असे मूडीजला वाटते. भारतीय तेल कंपन्या तुलनेत सौदी अरब, इराकसारख्या देशांमधून खनिज तेल पुरवठा वाढवू शकतात, असेही तिने सुचविले आहे.

आखाती देशांच्या तुलनेत इराण प्रति पिंप २ ते ४ डॉलर सवलत दराने इंधन पुरवठा करतो. या देशाची सरकारी कंपनी- नॅशनल इराणीयन ऑईल कंपनी आणि तिच्या सहयोगी कंपन्या या तेल वाहतुकीतही सवलत देतात.

२०१७-१९ मध्ये भारताने २२.०४ कोटी टन खनिज तेल आयात केले होते. पैकी ९.४ टक्के तेल हे इराणमधून आयात करण्यात आले. एप्रिल ते ऑगस्ट २०१८ या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या पाच महिन्यात भारताने ९.४९ कोटी टन खनिज तेल आयात करण्यात आले, तर याच दरम्यान इराणमधून आयात तेलाचे प्रमाण १४.४ टक्के होते.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, रिलायन्स इंडस्ट्रीज, नायरा एनर्जी अँड मँगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या कंपन्यांमार्फत भारतात इराणमधून इंधन आयात केले जाते.

Web Title: India will continue to buy irans oil
First published on: 28-09-2018 at 01:33 IST