औद्योगिक उत्पादनाची झेप १० टक्क्यांसमीप!

ऑक्टोबरमध्ये उद्योग क्षेत्राचे दिशादर्शक मानला जाणारा औद्योगिक उत्पादन दर थेट ९.८ टक्क्यांवर गेला आहे.

ऑक्टोबरमध्ये उद्योग क्षेत्राचे दिशादर्शक मानला जाणारा औद्योगिक उत्पादन दर थेट ९.८ टक्क्यांवर गेला आहे.

ऑक्टोबरच्या ९.८ टक्के दराने  * पाच वर्षांपूर्वीच्या उच्चांकाला गवसणी
सणांच्या हंगामात ग्राहकांकडून आलेल्या ग्राहकोपयोगी तसेच भांडवली वस्तूंच्या मागणीने देशातील औद्योगिक उत्पादन दर अचानक झेपावला आहे. यंदाच्या ऑक्टोबरमध्ये उद्योग क्षेत्राचे दिशादर्शक मानला जाणारा औद्योगिक उत्पादन दर थेट ९.८ टक्क्यांवर गेला आहे. यापूर्वीचा ७.८ टक्के हा सर्वोच्च दर हा ऑक्टोबर २०१० मध्ये होता.
आधीच्या – सप्टेंबर २०१५ मध्ये औद्योगिक क्षेत्राची वाढ ३.८४ टक्के तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत – ऑक्टोबर २०१४ मध्ये ती -(उणे)२.७ टक्के अशी राहिली आहे. एकूण औद्योगिक उत्पादनात सर्वाधिक हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राची वाढ ऑक्टोबरमध्ये १०.६ टक्के झाली आहे. या कालावधीत ऊर्जा निर्मिती ९ तर खनिकर्म वाढ ४.७ टक्क्यांची राहिली.
ऑक्टोबरमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राची वाढ तब्बल ४२.२ तर बिगर ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राची वाढ ४.७ टक्के झाली. भांडवली वस्तू क्षेत्राचा प्रवास १६.१ टक्क्यांनी विस्तारला आहे. तर मूळ वस्तूंच्या उत्पादनाचे प्रमाण ४.१ टक्क्यांनी वाढले आहे.
ऑक्टोबरमध्ये अधिकतर वाढ नोंदविलेले रत्न व दागिने (३७२.५ टक्के), साखर यंत्रे (१०३.४ टक्के), मोबाईलसह दूरसंचार उपकरण (६१.५ टक्के), औषधे (३८.५ टक्के), प्रवासी कार (२१.४ टक्के) हे क्षेत्र राहिले आहे.
चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते ऑक्टोबर या पहिल्या सात महिन्यांमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक ४.८ टक्के राहिल्याचे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ही वाढ निम्मी होती.
औद्योगिक उत्पादनात मोडणाऱ्या २२ उद्योगांपैकी १७ क्षेत्रांनी यंदा वाढ राखली आहे. फर्निचर निर्मितीही १३८.९ टक्क्यांनी वाढली आहे. रेडिओ, दूरचित्रवाणी संच निर्मिती ४७.५ टक्क्यांनी वाढले आहे.
ऑक्टोबरमध्ये नकारात्मक वाढ नोंदविलेल्या क्षेत्रांमध्ये प्रकाशन, मुद्रण, वैद्यकीय उपकरणे, घडय़ाळ, शीतपेय तसेच इंधन उत्पादन यांचा समावेश राहिला आहे.
वर्षभरात (ऑक्टोबर २०१४ ते ऑक्टोबर २०१५) दरम्यान प्रत्येक महिन्यात औद्योगिक उत्पादनात चढ-उतार नोंदविला गेला आहे. या कालावधीत यापूर्वीची सर्वाधिक वाढ ऑगस्ट २०१५ मध्ये ६.३ टक्क्यांची होती. तर मार्च व मे २०१५ मध्ये ती सर्वात कमी – २.५ टक्के राहिली होती.
चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत भारताने ७.४ टक्के विकास दर राखला आहे. अर्थव्यवस्था रुळावर आल्याचे ते द्योतक मानले जात असतानाच ऑक्टोबरमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढणाऱ्या औद्योगिक उत्पादनाने उद्योगक्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Industrial production jumps to 5 year high of 9 8 in october