मुंबई : सरलेल्या ऑगस्ट महिन्यात भारताच्या उद्योगजगतात इतिहासातील सर्वाधिक ८.४ अब्ज डॉलर (साधारण ६२ हजार कोटी रुपये) मूल्याचे संपादन आणि विलीनीकरणाचे सौदे पार पडले. सौद्यांची संख्या आणि त्यांच्या एकूण मूल्याच्या बाबतीत ऑगस्ट महिना फायदेशीरच नव्हे तर विक्रमी कामगिरीचा राहिला.

कंपन्यांदरम्यान संपादन आणि विलिनीकरणाचे ऑगस्ट २०२१ मध्ये एकूण २१९ व्यवहार पार पडले. गेल्या वर्षातील ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत त्यात दुप्पट वाढ झाली आहे. करोनामुळे देशव्यापी टाळेबंदी असल्यामुळे गेल्या ऑगस्टमध्ये अर्थचक्र मंदावले होते, त्याचा हा परिणाम असू शकेल, असे सल्लागार संस्था ‘ग्रँट थॉर्नटन’कडून सांगण्यात आले. तथापि यंदाच्या ऑगस्टमधील हे व्यवहार २००५ नंतरचे सर्वाधिक आहेत.

आधीच्या महिन्याशी म्हणजेच जुलैशी तुलना करता व्यवहारात संमिश्र कल बघायला मिळतो. संपादन आणि विलिनीकरण करारांमध्ये २१ टक्के वाढ झाली. मात्र कराराच्या मूल्यात ३६ टक्के घसरण झाली. खासगी भांडवली गुंतवणूक आणि साहसी भांडवलदार (व्हेंचर कॅपिटल) फंडांकडून १८२ व्यवहार पडले असून, त्यायोगे ७.६ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. आघाडीच्या भारतीय कंपन्या आणि नवउद्यमी ‘युनिकॉर्न’मध्ये झालेली गुंतवणूक ही प्रामुख्याने कंपनीला असलेली भविष्यातील मागणी, उच्च उद्योजकीय प्रतिभा आणि नवउद्यमींना असलेली संधी या गुणांच्या आधाराने करण्यात आली आहे.

‘औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये सुधारणा, देशात लसीकरणाला आलेला वेग, ग्राहकांची वाढलेली मागणी आणि आर्थिक सुधारणा कार्यक्रमांतील सातत्य यामुळे  परिस्थितीत आणखी सुधाराची आशा आहे,’ असे मत ‘ग्रँट थॉर्नटन’च्या सहयोगी शांती विजेता यांनी व्यक्त केले. यंदा ऑगस्टमध्ये ८६.७ कोटी डॉलरचे सुमारे ३७ विलीनीकरण आणि अधिग्रहण सौदे पार पडले. मात्र गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ९०.८ कोटी डॉलरचे ३० व्यवहार झाले होते.