देशातील किरकोळ महागाईचा दर नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच गेल्या १६ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. सलग सहाव्या महिन्यात हा दर वाढताना जानेवारी २०१६ मध्ये ५.६९ टक्क्य़ांवर गेला आहे. अन्नधान्याच्या किंमती वाढल्याने प्रामुख्याने दर गेल्या महिन्यात वाढला आहे.
ग्राहक किंमत निर्देशांकातील किरकोळ महागाईचा दर डिसेंबर २०१५ मध्ये ५.६१ टक्के तर वर्षभरापूर्वी, जानेवारी २०१५ मध्ये हा दर ६.४६ टक्के होता. अन्नधान्याच्या महागाईचा दर गेल्या महिन्यात ६.८५ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. भाज्यांच्या किंमती गेल्या महिन्यात तब्बल ६.३९ टक्क्य़ांनी वाढल्या आहेत. मटण, मासे यांच्या किंमती ८.२३ टक्क्य़ांनी वाढल्या. तर फळांच्या दरात घसरण होऊन ते (-)०.२४ टक्क्य़ांपर्यंत उतरले. डाळींच्या किंमती सर्वाधिक, ४२.३२ टक्क्य़ांपर्यंत वाढल्या आहेत.
कार विक्रीलाही ओहोटी
गेले सलग १४ महिने सुरू राहिलेल्या प्रवासी कारच्या विक्रीतील चढत्या क्रमाला वर्षांरंभी जानेवारी महिन्यात ओहोटी लागली. आधीच्या १,६९,५२७ च्या तुलनेत जानेवारीत १,६८,३०३ कारची विक्री झाली.