राज्याच्या नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणातील आकडेवारी फसवी असून, रोजगार निर्मितीचे चुकीचे चित्र तयार करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने बुधवारी करण्यात आला.
मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या माहिती पत्रकात २००३ ते २००९ या काळात ३ लाख ७५ हजार तर २०१० ते २०१५ या कालावधीत ३ लाख ७३ हजार रोजगार निर्मिती माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
याचाच अर्थ १२ वर्षांंत सात लाख, ४६ हजार रोजगार निर्मिती या क्षेत्रात झाली. याची सरासरी काढल्यास वर्षांत ६२ हजार रोजगार निर्मिती झाल्याचे स्पष्ट होते. हा वेग लक्षात घेता १० लाख रोजगार निर्मिती करण्यास किती वेळ लागेल, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी केला आहे.
गेल्या १२ वर्षांंत तीन लाख, २४ हजार कोटींची निर्यात करण्यात आल्याची माहिती सरकारी पत्रकात देण्यात आली आहे. म्हणजेच वर्षांला २७ हजार कोटींची निर्यात राज्यातून झाली आहे. मग एक लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचे लक्ष्य साधण्यात किती वेळ लागेल याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही, असे मोहिते यांनी सांगितले.
२००३ च्या माहिती तंत्रज्ञान धोरणानुसार २६३ कंपन्यांना इरादा पत्रे देण्यात आली होती, यापैकी ६४ कंपन्या प्रत्यक्ष सुरू झाल्या. २००९च्या धोरणानुसार २१२ कंपन्यांना इरादापत्रे देण्यात आली असली तरी ९६ कंपन्या सुरू झाल्या आहेत. फक्त बेरोजगारांना खुश करण्याकरिता रोजगार निर्मितीचे आकडे फुगविण्यात आल्याचा आरोप मोहिते यांनी केला.