एप्रिलमध्ये दर ५ टक्क्यांखाली; स्थिर अन्नधान्य किंमतीचा परिणाम

अन्नधान्याच्या रोडावलेल्या किमतीने एकूण महागाई दराने यंदा काहीसा दिलासा दिला आहे. एप्रिलमधील महागाई दर ५ टक्क्यांखाली स्थिरावला आहे.

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर एप्रिल २०२१ मध्ये ४.२९ टक्के नोंदला गेला आहे. आधीच्या महिन्यात तो ५.५२ टक्के होता.

केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी खात्याने बुधवारी याबाबत जाहीर केल्यानुसार, अन्नधान्याच्या किमतीचा दर एप्रिलमध्ये २.२ टक्के राहिला आहे. आधीच्या महिन्यातील ४.८७ टक्क्यांच्या तुलनेत तो यंदा निम्म्यावर आला आहे.

देशात अन्नधान्य तसेच वस्तूंचे उत्पादन तसेच पुरवठा टाळेबंदीदरम्यान अनियमित राहूनही ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक यंदा गेल्या तीन महिन्यांच्या किमान स्तरावर राहिल्याचे निरीक्षण इक्रा या वित्त संस्थेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी नोंदवले आहे.

वस्तू व सेवा क्षेत्रात पुन्हा एकदा मागणी नोंदवली जात असल्याचे चित्र आहे.