पीटीआय, नवी दिल्ली : देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाने सर्व श्रेणीतील वाहनांच्या किमती तात्काळ प्रभावाने १.३ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. वाहन निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. वाहनांच्या नवी दिल्लीतील विक्री दालनांमधील किमतींमध्ये सरासरी १.३ टक्के वाढ करण्यात आली. वाहन निर्मितीच्या विविध टप्प्यांवर वाढता खर्च आणि उत्पादन घटकांच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत वाढविलेल्या किमती जमेस धरल्यास वर्षभरात मारुती सुझुकीची वाहने जवळपास ८.८ टक्क्यांनी महागली आहेत.