चालकाला कॅमेऱ्याद्वारे रस्त्याचे ३६० अंशांतले छायाचित्रण दाखवणारी आलिशान मोटार बाजारात आली आहे. मर्सिडिज बेंझ ‘इ क्लास ३५० सीडीआय’ असे या मोटारीचे नाव असून या मोटारीचे उत्पादन कंपनीच्या चाकणमधील कारखान्यात करण्यात येणार आहे. कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक एबरहॉर्ड केर्न आणि राल्फ मुंगेनास्त यांच्या उपस्थितीत गुरुवारी या मोटारीचे अनावरण करण्यात आले.
रस्त्याचे छायाचित्रण दाखवणाऱ्या कॅमेऱ्याबरोबरच उघडता येणारे छत (पॅनोरमिक सनरूफ), ‘हार्मन कार्डन’ या प्रसिद्ध कंपनीची ध्वनियंत्रणा, चालकाच्या मागील बाजूस बसलेल्यांसाठी दूरदर्शन संचाची सोय आणि मोटारीला संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा ही या मोटारीतील आकर्षणे असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. या मोटारीची पुण्यातील ‘एक्स शो-रूम’ किंमत ५७.४२ लाख अशी ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या ‘इ क्लास’ मोटारींपैकी ‘इ २००- पेट्रोल’ आणि ‘इ २५०- डिझेल’ या मोटारी आधीपासूनच बाजारात आहेत.
‘इ-क्लास’ ही कंपनीची सर्वाधिक खपणारी मोटारींची श्रेणी असल्याचे केर्न यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘कंपनीच्या देशातील विक्रीत इ- क्लास मोटारींचा ३० टक्के वाटा असून आतापर्यंत देशात २५ हजार इ-क्लास मोटारींची विक्री झाली आहे. त्यानंतर विक्रीत सी-क्लास मोटारींचा क्रमांक आहे, परंतु सध्या कंपनीने सी-क्लास मोटारींचे उत्पादन बंद केले आहे. देशात कंपनीच्या ४५ टक्के मोटारी मुंबई आणि दिल्लीत विकल्या जातात. पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, बंगळुरू, कोलकाता या बाजारपेठा देखील आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत.’’