भारतीय उद्योग क्षेत्राबाबतही ‘मूडीज्’चा सकारात्मक कयास

नवी दिल्ली : देशभरात वाढलेला लसीकरणाचा दर, निम्न पातळीवरील व्याजाचे दर, सार्वजनिक खर्चात मोठय़ा वाढीचे सरकारचे नियोजन आणि ग्राहकांकडून बळावलेली मागणी हे सर्व घटक भारताच्या उद्योग क्षेत्रासाठी सकारात्मक ठरतील आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठीही उपकारक ठरतील, असे प्रतिपादन मूडीज् इन्व्हेस्टर्स सव्‍‌र्हिसेसने गुरुवारी केले.

मूडीज्च्या ताज्या अनुमानानुसार, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर विद्यमान २०२१-२२ आर्थिक वर्षांत ९.३ टक्के तर, त्या पुढील २०२२-२३ आर्थिक वर्षांसाठी ७.९ टक्क्यांची पातळी गाठू शकेल. अर्थव्यवस्थेतील चिरंतन फेरउभारी यासह, ग्राहकांच्या मजबूत मागणीमुळे कंपन्यांच्या मिळकतीतील दृश्यमान वाढ एकंदरीत पतमानांकनात वाढीसाठीही अनुकूल असल्याचे मूडीज्ने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात मत नोंदविले आहे. पुढील १२ ते १८ महिन्यांत भारतीय कंपन्यांना किमान १५ ते २० टक्के वृद्धीदराने वाढ साधता येणे शक्य असल्याचा अहवालाचा कयास आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय कडाडलेल्या वस्तूंच्या किमतीचा उत्पादन घटकांवरील परिणाम आणि विषाणूजन्य साथीच्या संसर्गाची नवीन लाट आणि त्या परिणामी संभाव्य टाळेबंदीसारखे उपाय योजावे लागल्यास या अनुमानांत लक्षणीय बदल संभवतो, असा इशाराही मूडीज्च्या विश्लेषकांनी दिला आहे.