नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने स्वच्छ ऊर्जा पर्यायांबद्दल ध्यासाने चांगलीच गती पकडली असून, या क्षेत्रातील नवीन दोन मोठय़ा आर्थिक उलाढालींची घोषणा कंपनीकडून बुधवारी करण्यात आली. सौर वीजनिर्मितीसाठी उपयुक्त फोटोव्होल्टेक सौर चकत्यांच्या उत्पादनातील जर्मन कंपनीचे अधिग्रहण आणि डेन्मार्कस्थित हायड्रोजन इलेक्ट्रोलायजर क्षेत्रातील कंपनीबरोबर तंत्रज्ञान हस्तांतरणाचा करार तिने केला आहे.

तीन दिवसांपूर्वीच रिलायन्सने नॉर्वेस्थित सौर पटलांच्या निर्मितीतील आरईसी सोलर होल्डिंग्ज या कंपनीचा ७७.१ कोटी अमेरिकी डॉलरच्या मोबदल्यात ताबा मिळविला आहे. तर त्याच दिवशी शापूरजी पालनजी समूहातील स्टर्लिग अँड विल्सन सोलर या कंपनीत ४० टक्के भागभांडवली हिस्सेदारी मिळविल्याची घोषणाही कंपनीने केली आहे. हे दोन्ही व्यवहार हरित ऊर्जा व्यवसायासाठी स्थापित रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड या उपकंपनीमार्फत केले गेले आहेत.

ताज्या व्यवहारातही, रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडने नेक्सव्ॉफ जीएमबीएच या कंपनीचे २.५ कोटी युरो (साधारण २१८ कोटी रुपये) मोबदला देऊन अधिग्रहण केले आहे, असे रिलायन्स इंडस्ट्रीजने भांडवली बाजाराला मंगळवारी उशिराने सूचित केले.

डेन्मार्कच्या स्टाइसडल एएस या कंपनीच्या तंत्रज्ञानावर आधारित हायड्रोलायजर्सच्या भारतात वितरणाचे अधिकारही रिलायन्स न्यू एनर्जी सोलरने मिळविले आहेत.

हे सर्व व्यवहार सौर विजेच्या निर्मितीसाठी फोटोव्होल्टेक रचनेचे परिमाण मिळविण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची पूर्तता करतात आणि आगामी काही वर्षांत चार महाकाय पीव्ही मॉडय़ूल निर्मितीचे प्रकल्प थाटण्याच्या रिलायन्सच्या योजनेला अनुसरून हे व्यवहार पार पडले आहेत. कंपनीने या नियोजनावर तीन वर्षांत एकूण १० अब्ज अमेरिकी डॉलर म्हणजेच ७,५०० कोटी रुपये खर्च करण्याचे ठरविले आहे. सध्याच्या तुलनेत एक-पंचमांश (२० टक्के) किमतीला स्वस्त व स्वच्छ वीज उपलब्ध करून देण्याचे रिलायन्सचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे.