नोव्हेंबरअखेर २७ लाख कोटी गुंतवणूक; रोखे संलग्न योजनांकडे अधिक ओघ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोलायमान भांडवली बाजाराच्या तुलनेत बँक तसेच सार्वजनिक कंपन्यांच्या फंडांसह रोखे संलग्न योजनांमधील गुंतवणूकदारांच्या वाढत्या ओघामुळे देशातील एकूण म्युच्युअल फंड मालमत्ता विक्रमी टप्प्यावर झेपावली आहे. देशातील प्रमुख ४४ फंड घराण्यातील मिळून मालमत्ता नोव्हेंबरअखेर २७.०४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. आधीच्या, ऑक्टोबरमधील २६.३३ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या तुलनेत हे प्रमाण ३ टक्क्य़ांनी वाढले आहे.

‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ अर्थात ‘अ‍ॅम्फी’ने सोमवारी जाहीर केलेल्या नोव्हेंबर २०१९ अखेरच्या आकडेवारीनुसार, यंदा ५४,४१९ कोटी फंड मालमत्ता वाढली आहे. मात्र ऑक्टोबरमधील १.३३ लाख कोटी रुपयांच्या भर तुलनेत यंदा ही रक्कम कमी आहे.

गेल्या महिन्यात रोखे संलग्न योजनांमधील निधी ओघ ५१,००० कोटी रुपयांनी वाढला. त्यातही कमी कालावधीच्या रोखे फंडांमध्ये २०,६५० कोटी रुपये जमा झाले आहेत. स्थिर उत्पन्न गटातील ही गुंतवणूक यंदापर्यंतची सर्वाधिक फंड गुंतवणूक ठरली आहे.

बँक तसेच सरकारी कंपन्यांशी निगडित फंडांमध्ये यंदा ७,२३० कोटी रुपये जमा झाले आहेत. तर ६,९३८ कोटी रुपयांचा निधी ओघ गेल्या महिन्यात लिक्विड फंडांमध्ये राहिला आहे. ओपन एन्डेड इक्विटी योजनांमध्ये यंदाच्या नोव्हेंबरमध्ये १,३१२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तर यातून गेल्या महिन्यात ३७९ कोटी रुपयांचे निर्गमन झाले आहे. परिणामी त्यातील रक्कम गेला महिनाअखेर ९३३ कोटी रुपये नोंदली गेली आहे. ऑक्टोबरमध्ये त्यात ६,०१५ कोटी रुपयांचा निव्वळ निधी ओघ होता.

किरकोळ गुंतवणूकदारांच्या पसंतीचा पर्याय असलेल्या एसआयपीमध्ये यंदाही वाढ अनुभवली गेली असून त्यातील रक्कम सार्वकालिक अशा ३.१२ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचेही अ‍ॅम्फीच्या सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. गोल्ड ईटीएफमध्येही ऑक्टोबरमध्ये घसरण नोंदविल्यानंतर गेल्या महिन्यात अवघ्या ७ कोटी रुपयांची का होईना भर पडली आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये नफेखोरी अवलंबिल्याने समभाग संलग्न योजनांमधील निधी ओघ काही प्रमाणात कमी झाला; मात्र एकूण फंड उद्योगाने गेल्या महिन्यात २७ लाख कोटी रुपये असा सर्वोत्तम प्रवास नोंदविला आहे. – एन. एस. व्यंकटेश, मुख्य कार्यकारी अधिकारी, अ‍ॅम्फी.

Web Title: Mutual fund asset sale akp
First published on: 10-12-2019 at 01:12 IST