तिसऱ्या फळीतील नव्या बँक परवान्यांसाठी क्रम न लागणाऱ्या कंपन्या, उद्योगांना रिझव्‍‌र्ह बँकेकडे नव्याने अर्ज करावा लागणार आहे. हे अर्जदार प्रत्यक्ष बँकेपेक्षा अन्य वित्तसेवा क्षेत्रात अधिक चांगली सेवा बजावू शकतात, अशा शब्दांत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी उर्वरित २३ अर्जदारांना अशा सेवांसाठी अर्ज करावा, असे आवाहन केले.
डॉ. राजन हे शुक्रवारी मध्यवर्ती बँकेतर्फे आयोजित राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेच्या वार्षिक समारंभासाठी पुण्यात आले होते. बुधवारी बँक व्यवसायासाठी नाव न जाहीर झालेले अन्य अर्जदार हे बँकिंग क्षेत्रातील मूळ व्यवसायाव्यतिरिक्त अन्य सेवा क्षेत्रांत अधिक चांगली सेवा बजावू शकतात, असे गव्हर्नरांनी स्पष्ट केले. या अर्जदारांना पुन्हा रिझव्‍‌र्ह बँकेकडे अर्ज करावे लागतील, असेही ते म्हणाले.
रिझव्‍‌र्ह बँकेकडे प्राप्त झालेल्या २७ अर्जदारांपैकी दोघांनी माघार घेतली आहे, तर २५ पैकी केवळ आयडीएफसी व बंधन या दोन वित्तसंस्थांना परवान्यासाठी प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. टपाल विभागाच्या अर्जाबाबत रिझव्‍‌र्ह बँक सरकारबरोबर स्वतंत्र चर्चा करून निर्णय घेणार आहे. नव्याने अर्ज करण्यासाठीदेखील रिझव्‍‌र्ह बँक नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार आहे.
नव्या बँक परवान्यांसाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडे आलेल्या अर्जदारांची छाननी करताना निवड समितीला परवाना न मिळालेले अर्जदार अन्य सेवा देऊ शकतात असे वाटले, असे राजन यांनी सांगितले.
अशा अर्जदारांनी निश्चितच अर्ज करावा, असेही त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर परवाना मिळालेल्या दोन वित्तसंस्था योग्य असल्याबद्दल रिझव्‍‌र्ह बँकेसह निवड समितीचेही एकमत झाले, असेही ते म्हणाले.