कोटय़वधी रुपयांची देणी थकल्याने सौदे स्थगित करणे भाग पडलेल्या नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि.- ‘एनएसईएल’वरील संकट गडद होत चालले आहे. देणीदारांची रक्कम कशी व किती अदा केली याबाबत पारदर्शकतेसाठी हे वेळापत्रक दररोज संकेतस्थळावर झळकविण्यास कंपनीला सांगण्यात आले आहे. या प्रकरणात केंद्रीय अर्थव्यवहार सचिवांची विशेष समिती नेमण्याची पावले उचलण्यात येत असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने गुरुवारी जाहीर केले. हे सारे घडत असतानाच या बाजारमंचाविरुद्ध बडे गुंतवणूकदारही एकत्र आले असून प्रसंगी ते कंपनीच्या प्रवर्तकाची खाती जप्त करण्यासह कायदेशीर मार्ग अनुसरत आहेत.
गुंतवणूकदारांना टप्प्याटप्प्याने देण्यात येणाऱ्या रकमेचे वेळापत्रक दर दिवसअखेर कंपनीच्या संकेतस्थळावर झळकविण्याचे आदेश एनएसईएलला देण्यात आले आहेत. एनएसईएलने वायदे बाजार आयोगाला (एफएमसी) सविस्तर अहवाल सादर केल्यानंतर हे आदेश देण्यात आले.  गोदामातील जिनसांच्या साठय़ाचेही परीक्षण करण्यात येणार येईल, असे एफएमसीने संकेत दिले.   एनएसईएलने १६ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने गुंतवणूकदारांची देणी चुकती करण्याचा आराखडा सरकारला गुरुवारी सादर केला.