नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरण कंपनी असलेल्या ऑइल इंडियावर सायबर हल्ला करण्यात आला असून सायबर हल्लेखोरांकडून ७५ लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच ५७ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली असल्याचे कंपनीकडून बुधवारी उशिरा सांगण्यात आले. याबाबत कंपनीकडून भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सायबर हल्ला झाल्याने कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून कंपनीच्या तंत्रज्ञान प्रणालीवर ‘मालवेअर’ हल्ला करण्यात आल्यामुळे कंपनीच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे, असे ऑइल इंडियाचे व्यवस्थापक (सुरक्षा) सचिन कुमार यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे. हा सायबर हल्ला १० एप्रिलला कंपनीच्या भूवैज्ञानिक आणि जलाशय विभागाच्या संगणकीय कार्यस्थानांपैकी एकावर झाला होता. मात्र याची माहिती-तंत्रज्ञान विभागाकडून मंगळवारी दिली गेली. यामुळे कंपनीचे सव्‍‌र्हर आणि क्लायंट यांच्या संगणकीय जाळय़ात व्यत्यय आल्याचे प्राथमिक तपासणीनंतर समोर आले आहे.

सायबर हल्लेखोराने संक्रमित संगणकाच्या माध्यमातून ७५ लाख अमेरिकी डॉलर मूल्याच्या आभासी चलनाची मागणी केली आहे.