उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे खाद्य क्षेत्रातील प्रमुख कंपनी पार्ले प्रॉडक्ट्सने त्यांच्या सर्व श्रेणीतील उत्पादनांच्या किमतीत पाच ते १० टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. साखर, गहू आणि खाद्यतेलासारख्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने कंपनीला आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवाव्या लागल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कंपनीचे सर्वात लोकप्रिय ग्लुकोज बिस्किट पार्ले जी आता ६ ते ७ टक्क्यांनी महाग झाले आहे. यासह, कंपनीने केक विभागात ७ ते ८ टक्क्यांनी किमती वाढवल्या आहेत. पार्लेच्या बिस्किट विभागातील उत्पादनांमध्ये Parle G, Hide & Seek आणि Crackjack या लोकप्रिय ब्रँडचा समावेश आहे.

पार्ले प्रॉडक्ट्सचे वरिष्ठ श्रेणी प्रमुख मयंक शाह म्हणाले, “आम्ही किमती ५-१० टक्क्यांनी वाढवल्या आहेत. त्याच वेळी, किमती आकर्षक पातळीवर ठेवण्यासाठी, पॅकेटच्या वजनामध्ये कपात करण्यात आली आहे.”

“उत्पादन खर्चावरील महागाईचा दबाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. बर्‍याच कंपन्यांना याचा सामना करावा लागत आहे. खाद्यतेलासारख्या सामग्रीच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० ते ६० टक्क्यांनी वाढल्यामुळे कंपनी महागाईच्या दबावाला तोंड देत आहे,” असे मयंक शहा यांनी म्हटले आहे.

कंपनीने २० रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची बिस्किटे आणि इतर उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. या आर्थिक वर्षात पार्लेने केलेली ही पहिली वाढ आहे. यापूर्वी, कंपनीने जानेवारी-मार्च २०२१ च्या तिमाहीत किमती वाढवल्या होत्या, पण ते २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात करण्यात आले होते.