सप्टेंबर २००९ नंतरची म्हणजे गत पाच वर्षांतील प्रति पिंप ६५.२९ डॉलर अशी सर्वात नीचांकी पातळी सोमवारी दाखविणारे कच्चे तेल, मंगळवारच्या व्यवहारात काहीसे सावरले आणि पुन्हा प्रति पिंप ६७ डॉलरपाशी आले. तरी जूनपासून सलग पाच महिने सुरू राहिलेल्या घसरणीने कच्च्या तेलाच्या किमती ४० टक्क्य़ांहून अधिक खालावल्या आहेत.
लंडनच्या बाजारात भारतात प्रामुख्याने आयात होत असलेल्या ‘ब्रेन्ट क्रूड’च्या जानेवारीत पूर्तता होणाऱ्या सौद्यांसाठी किमतीमध्ये सोमवारी चालू वर्षांतील तिसरी मोठी घट दिसून आली. ब्रेन्ट क्रूडच्या किमती तब्बल ४.२ टक्क्य़ांनी म्हणजे प्रति पिंप २.८८ डॉलरने घसरून ६५.२९ डॉलर अशा पंचवार्षिक नीचांकावर आल्या. तथापि, मंगळवारच्या व्यवहारात खरेदीचा जोर वाढल्याने ते ६५ सेंट्सने वाढून प्रति पिंप ६६.८४ डॉलरवर आले.
अमेरिकेच्या बाजारातही मंगळवारी कच्च्या तेलाचे व्यवहार हे प्रति पिंप ६३.९८ डॉलर या सुधारलेल्या स्तरावर झाले. सोमवारी तेथेही किमती दणक्यात घसरून प्रति पिंप ६२.२५ डॉलरवर आल्या होत्या. जुलै २००९ नंतरचा हा तेलाचा सर्वात नीचांक स्तर आहे. प्रमुख विदेशी चलनाच्या तुलनेत काहीसे कमकुवत बनलेले अमेरिकी चलन- डॉलरनेही कच्च्या तेलाच्या किमती सावरण्यास मंगळवारी हातभार लावला. मंगळवारी डॉलरचे मूल्य हे ०.३ टक्क्य़ांनी घसरले.
अमेरिकेतील शेल तेलसाठय़ातून उत्पादन वेगाने वाढत असून, अमेरिकेची कच्च्या तेलासाठी आयातीवरील मदार कमी झाली आहे. त्या उलट तेल उत्पादक राष्ट्रांची संघटना- ‘ओपेक’ने आखातातील विहिरीतून तेल उत्पादनात कोणतीही कपात न करण्याचा गेल्या महिन्यात निर्णय जाहीर केला. तेलाच्या मुबलक पुरवठय़ाने किमती ओसरू लागल्या आहेत.
दरम्यान, अमेरिकेतील तीन बडय़ा शेल उत्पादकांनी जानेवारीपासून प्रति दिन एक लाख पिंपाहून अधिक उत्पादनात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी, तेलाच्या अतिरिक्त पुरवठय़ाच्या स्थितीत ब्रेन्ट क्रूडच्या किमती या आगामी २०१५ सालाच्या पूर्वार्धात प्रति पिंप ५० डॉलपर्यंत ओसरण्याचा कयास व्यक्त केला आहे. २०११ ते २०१३ सालात ब्रेन्ट क्रूडची सरासरी किमत ११० डॉलर होती. २०१४ सालच्या जूनपर्यंत ती प्रति पिंप ११५ डॉलपर्यंत भडकली आणि त्यानंतर किमतीत निरंतर उतार सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Possible decrease of up to 60 per barrel crude oil
First published on: 10-12-2014 at 12:28 IST