गेले वर्षभर झाकोळलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागांना शेअर बाजारात गुरुवारी झळाळी चढली. एकीकडे केंद्र सरकारने दिलेले भांडवली स्फुरण तर दुसरीकडे सरलेल्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि बँक ऑफ बडोदा यांची अपेक्षेपेक्षा सरस राहिलेल्या तिमाही कामगिरीचे प्रत्यंतर त्यांच्या समभागांच्या वधारलेल्या भावात दिसले. परिणामी एकूण सरकारी बँकांचा निर्देशांक गेले काही दिवस वरच्या दिशेने सुसाटला आहे. गुरुवारी सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ‘सीएनएक्स पीएसयू बँक निर्देशांक’ सर्वाधिक ७.४० टक्क्यांनी वधारला. एकुणात यंदाच्या सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांच्या ऐतिहासिक उच्चांकाकडील वाटचालीत बँकिंग क्षेत्राचे असामान्य योगदान दिसून येत आहे.
* बँक ऑफ बडोदा
सप्टेंबर तिमाहीत निव्वळ नफा गेल्या वर्षांच्या याच तिमाहीच्या तुलनेत १०.२४ टक्के घटून ११६८ कोटींवर आला आहे. तरी तिमाहीतील अपवादात्मक खर्च पाहता, विश्लेषकांनी अपेक्षिलेल्या नफाक्षमतेपेक्षा तो सरसच आहे. एकूण उत्पन्नात ९.३९ टक्के वाढ समाधानकारक आहे.
ल्ल  बँक ऑफ इंडिया :
निव्वळ नफ्यात ३० सप्टेंबर २०१३ अखेर जवळपास दोन पटीने वाढ दाखवीत तो ६२१ कोटींवर गेला आहे. तिमाहीत एकूण उत्पन्नही १६१८ टक्क्यांनी वाढून १०,३३९ कोटींवर गेले आहे.
*अलाहाबाद बँक :
या बँकेनेही तिमाही निव्वळ नफ्यात गेल्या वर्षांच्या तुलनेत सुमारे १८ टक्क्यांची वाढ करीत तो २७६ कोटींवर नेला आहे. तिमाहीत एकूण उत्पन्न तर ३७.५६ टक्के वाढून ६,३०३ कोटींवर गेले आहे.
*युनियन बँक ऑफ इंडिया :
थकीत कर्जापोटी वाढत्या तरतुदीमुळे बँकेचा तिमाही निव्वळ नफा तब्बल ६२ टक्के घटून २०८ कोटींवर ओसरला आहे (गुरुवारी शेअर बाजारात व्यवहार संपल्यावर जाहीर निकाल). तथापि बँकेचे व्याजापोटी उत्पन्न मागील तुलनेत ६ टक्क्यांनी वाढून १,९५४ कोटींवर गेले आहे.
*सिंडिकेट बँक
निव्वळ नफा माफक १.४ टक्क्यांनी वधारून ४७०.१२ कोटींवर गेला. तथापि एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ४,५४६ कोटींवरून यंदाच्या तिमाहीत ४,८५० कोटींवर गेला.