नवी दिल्ली : देशातील सिनेमागृहांची साखळी चालविणाऱ्या दोन सर्वात मोठय़ा कंपन्या पीव्हीआर लिमिटेड आणि आयनॉक्स लीझर लिमिटेड यांनी विलीन होण्याचा निर्णय, एकूण १,५०० पडद्यांचे जाळे असणारी या क्षेत्रातील महाकाय कंपनीची वाट मोकळी करून दिली आहे. उभय कंपन्यांच्या संचालक मंडळाने रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी दिलेल्या या निर्णयाचे सोमवारी भांडवली बाजारात कंपन्यांच्या समभाग मूल्यात अपेक्षित सकारात्मक पडसाद उमटले.

दोन्ही कंपन्यांच्या समभागांनी वरचे सर्किट गाठावे इतकी गुंतवणूकदारांकडून सोमवारी खरेदी पाठबळ मिळविले. आयनॉक्स लीझरचा समभाग १९.९९ टक्के उसळी घेतली आणि ५६३.६० रुपये असे ५२ सप्ताहांतील उच्चांकी मूल्य त्याने गाठले. दिवसाची अखेर त्याने ११.३३ टक्के वाढीसह ५२२.९० या पातळीवर केली. बरोबरीनेच ९.९९ टक्के उसळी घेत पीव्हीआरनेही २,०१०.३५ रुपये अशा ५२ सप्ताहांतील उच्चांकपद गाठले. सोमवारचा व्यवहार थंडावताना  हा समभाग ३.०६ टक्के वाढीसह १,८३३ रुपयांवर स्थिरावला.

करोनाप्रभावित दोन वर्षांच्या काळाने चित्रपट प्रदर्शन उद्योगावर विपरीत आर्थिक परिणाम केला आहे, त्याच वेळी डिजिटल ओटीटी व्यासपीठांच्या वेगवान वाढ आणि लोकांकडून होत असलेल्या स्वीकृताचाही या व्यवसायावर लक्षणीय ताण आला आहे. विलीनीकरणाच्या या घोषणेला या घटकांची पार्श्वभूमी असून, देशातील मल्टिप्लेक्स उद्योगात यातून मोठा बदल घडून येईल.

विलीनीकरणानंतर, संयुक्त कंपनीचे ‘पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड’ असे नामकरण करण्यात येणार असले, तरी पीव्हीआर आणि आयनॉक्सची सिनेमागृहे सध्या आहे त्या नावानेच सुरू राहतील. पीव्हीआरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय बिजली हे संयुक्त कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असतील.

भागधारकांना काय मिळणार?

करारानुसार, आयनॉक्सचे पीव्हीआरमध्ये विलीनीकरण होत असून, आयनॉक्सच्या भागधारकांना त्यांच्याकडील प्रत्येक १० समभागांमागे, पीव्हीआरचे तीन समभाग हे विलीनीकरण मार्गी लागल्यावर मिळू शकतील.