पीएनबी घोटाळ्याचे मूळ असलेल्या प्रणालीच्या दुरुस्तीसाठी रिझव्‍‌र्ह बँकेचे पाऊल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पीएनबी’ घोटाळ्याचे मूळ असलेली ‘स्विफ्ट’ प्रणाली ही बँकांच्या ‘कोअर बँकिंग प्रणाली (सीबीएस)’शी संलग्न करणे बंधनकारक करणारा आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने काढला असून, त्यासाठी ३० एप्रिलची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. अद्याप पीएनबीसह अनेक सरकारी बँकांनी याबाबतची पूर्तता केलेली नाही.

आंतरराष्ट्रीय स्तरावरून एकापेक्षा अधिक बँकांमधील व्यवहार करत हिरे व्यापारी नीरव मोदीने देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेला ११,४०० कोटी रुपयांना फसविले. पीएनबीच्या हवाल्याने बनावट हमीपत्रे मिळवीत मोदीने अन्य बँकांमार्फतही पैसे उचलले.  आणि या फसवणुकीचा छडा सात वर्षांनंतर लागला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकेच्या व्यवहाराबाबतचे निर्देश ‘स्विफ्ट’ (सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन्स)द्वारे दिले जातात. तथापि बँकांमध्ये ‘सीबीएस’ प्रणाली येण्याआधीपासून अस्तित्वात असलेली ‘स्विफ्ट’ ही यंत्रणा ‘कोअर बँकिंग’शी संलग्न केली गेली नसल्याने या लबाडीच्या व्यवहाराची  पीएनबीच्या वरिष्ठ कार्यपालकांना माहितीच मिळू शकलेली नव्हती.

मात्र बँक क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा घडूनही पीएनबीची याबाबतची सज्जता अद्याप झालेली नाही. तसेच नीरव मोदीला कर्ज देणाऱ्या अलाहाबाद बँकेचीही तशी संलग्नता नाही. ही माहिती या दोन्ही बँकांचे वरिष्ठ पद भूषविलेल्या उषा अनंतसुब्रमणियन यांनी शुक्रवारी मुंबईत दिली.

उषा अनंतसुब्रमणियन या पंजाब नॅशनल बँकेत जुलै २०११ ते नोव्हेंबर २०१३ दरम्यान कार्यकारी संचालक तर ऑगस्ट २०१५ ते मे २०१७ दरम्यान व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी होत्या. यानंतर त्यांची नियुक्ती देशातील पहिल्या भारतीय महिला बँकेच्या अध्यक्षपदी झाली होती. या बँकेचे अध्यक्षपद भूषविल्यानंतर त्या अलाहाबाद बँकेत अध्यक्षा म्हणून रुजू झाल्या.

‘स्विफ्ट’ ही यंत्रणा ‘कोअर बँकिंग’शी जोडणे बँकांना रिझव्‍‌र्ह बँकेने अनिवार्य केले असून येत्या ३० एप्रिलपर्यंत त्याची पूर्तता करणे बंधनकारक आहे. बँकांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवहारासाठी राबविल्या जाणाऱ्या ‘स्विफ्ट’ या यंत्रणेला सायबर हल्ल्यांचा धोका असल्याची बाब खासगी बँक क्षेत्रातील सिटी युनियन बँकेने निदर्शनास आणली होती. याद्वारे हॅकरचा २० लाख डॉलर रक्कम हस्तांतरित करण्याचा प्रयत्न होता, असेही बँकेने स्पष्ट केले होते.

‘स्विफ्ट’ या यंत्रणेचा उदय १९७३ मध्ये ब्रसेल्स येथे सात बँकांच्या समूहामार्फत झाला. त्यानंतर पुढील चार वर्षे ही यंत्रणा कार्यरत राहिली. त्यानंतर तिची जागा ‘टेलेक्स’ने घेतली. मात्र ‘स्विफ्ट’प्रमाणेच कार्यरत या यंत्रणाचा विविध २००हून अधिक देशातील ११,०००हून अधिक बँका, वित्त संस्था, दलाल पेढय़ा, म्युच्युअल फंड संस्था आदी उपयोग करत आहे. मात्र सुरक्षित व्यवहारांकरिता ही यंत्रणा ‘कोअर बँकिंग’शी जोडणे आवश्यक आहे.

नीरव मोदी घोटाळ्यात सहभागी कर्मचाऱ्यांनी ‘स्विफ्ट’बाबतचा पासवर्ड वापरून अन्य बँकांमार्फत मोदीकरिता अधिक कर्ज उपलब्ध करून दिले. ‘कोअर बँकिंग’शी ही यंत्रणा संलग्न असती तर व्यवहारांबाबत माहिती उजेडात आली असती असेही सांगण्यात येते.

Web Title: Rbi asks banks to integrate swift in core banking system
First published on: 24-02-2018 at 05:00 IST