पटेल, राकेश मोहन, गोकर्ण, भट्टाचार्य गव्हर्नरपदाच्या शर्यतीत

रघुराम राजन यांचा वारसदार शोधण्यासाठी सरकारकडून प्रयत्न

रिझव्‍‌र्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर म्हणून पंतप्रधानांची निवड रिझव्‍‌र्ह बँकेचे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल, माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन आणि सुबीर गोकर्ण आणि भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य या चार उमेदवारांवरच केंद्रित झाली असल्याचे अधिकृत संकेत मिळत आहेत..

अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेच्या दृष्टीने लवकरात लवकर रघुराम राजन यांचा वारसदार शोधण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून, सरकारने नव्याने स्थापित करण्यात येणाऱ्या पतधोरण निर्धारण समिती (एमपीसी)च्या सदस्यांसह, नवे गव्हर्नर म्हणून चार उमेदवारांच्या नावांवर निवडीसाठी लक्ष केंद्रित केले असल्याचे कळते. संसदेचे पुढील महिन्यात नियोजित पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी नवे गव्हर्नर कोण याची सरकारकडून घोषणा होणे अपेक्षित आहे.
रघुराम राजन यांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदासाठी मुदतवाढ न स्वीकारता, स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांच्या वारसदाराचा सुरू झालेला शोध अंतिम टप्प्यात आला असल्याचे पंतप्रधान कार्यालयाची वरिष्ठ सूत्रांकडून समजते. गव्हर्नरपदासाठी अंतिम चार जणांची नावे निवडण्यात आली असून त्यापैकीच एकाची रिझव्‍‌र्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर म्हणून वर्णी लागेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या चार जणांमध्ये रिझव्‍‌र्ह बँकेचे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल, माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन आणि सुबीर गोकर्ण आणि भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांचा समावेश आहे.
याशिवाय राजन यांच्या निवृत्तीपूर्वी पतधोरण समितीच्या सदस्यांची निवड करण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. खुद्द राजन हेही या सदस्य निवडीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या या पतधोरण निर्धारण समितीवरील सहा सदस्यांपैकी तीन सरकारनियुक्त बाह्य़ सदस्य असतील, ज्यांच्या निवडीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
रघुराम राजन यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि भारतीय भांडवली बाजारात त्याचे नकारात्मक पडसाद उमटले होते. त्यानंतर सरकारने विविध नऊ क्षेत्रांत थेट परकीय गुंतवणूक खुले करणारे मोठे निर्णय जाहीर करत ही नकारात्मकतेची लाट काही प्रमाणात थोपविण्याचा प्रयत्न केला, मात्र अर्थव्यवस्था स्थिर राखण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर राजन यांचा उत्तराधिकारी शोधण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. राजन यांच्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आणि त्यांनी आपल्या कारकीर्दीत जे वलय प्राप्त केले तसा तुल्यबळ उमेदवार मिळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तर नवीन गव्हर्नर हे रिझव्‍‌र्ह बँकेची स्वायत्तता अबाधित राहील, इतके सक्षम असतील काय, अशी अर्थजगतापुढे चिंता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rbi governor choice narrows down to four