मुंबई : देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ७६२६.६ कोटींचा करोत्तर नफा कमावला. पत गुणवत्तेत सुधारणा आणि निव्वळ व्याजापोटी उत्पन्नात वाढीमुळे बँकेला ही सशक्त कामगिरी करता आली.

सरलेल्या तिमाहीत बहुतांश मापदंडांवर बँकेला चांगली कामगिरी करता आली आहे. वर्षागणिक तिमाही नफ्यातील भरीव ६६.७ टक्क्यांची वाढ ही आजवरची सर्वोच्च कामगिरी आहे, अशी स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश खरा यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली.

तिमाहीत आतापर्यंतचा सर्वाधिक नफा मिळविलेल्या स्टेट बँकेच्या दमदार कामगिरीमुळे बुधवारी बँकेच्या समभागाने ५४२.४० रुपयांची सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली. समभाग १.१४ टक्क्यांनी वधारून ५२७.६५ रुपयांवर दिवसअखेर स्थिरावला.