प्रति डॉलर ६९च्या खाली लोळण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेत तेथील मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदरात वाढ केली जाणार असल्याच्या शक्यतेने मजबूत बनलेल्या डॉलरने गुरुवारी भारतीय चलन- रुपयावर मोठा दबाव निर्माण केला. परिणामी रुपयाचे प्रति डॉलर विमिमय मूल्य ६९.०५ अशा ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरले. प्रमुख आंतरराष्ट्रीय चलनांच्या तुलनेत डॉलरचे मूल्य आता वर्षभराच्या वरच्या टप्प्यावर आहे.

एकाच व्यवहारात रुपयाची डॉलरमागे ४३ पैशाची घसरगुंडी गुरुवारी अनुभवास आली. ही चालू वर्षांतील २९ मेनंतरची रुपयाची सर्वात मोठी आहे. एप्रिल २०१८ पासून खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती उसळत असून, त्याचा ताण रुपयाच्या मूल्यावर निरंतर दिसून आला आहे. मध्यंतरी रिझव्‍‌र्ह बँकेकडून हस्तक्षेप करताना डॉलरचा पुरवठा वाढविला आणि त्या परिणामी रुपया डॉलरमागे ६८ च्या पातळीवर स्थिरावलेला दिसून आला.

गुरुवारी चलन बाजारातील व्यवहारांमध्ये अमेरिकेच्या अर्थधोरणाच्या धास्तीमुळे येथील बँका तसेच निर्यातदारांकडून डॉलरची मागणी एकदम वाढली. परिणामी सत्रात ६९.१० पर्यंत घसरल्यानंतर रुपया सत्रअखेर काहीसा सावरला. मात्र त्याचा ६९.०५ हा बंद स्तर ऐतिहासिक ठरला. त्याचबरोबर त्याची सत्रातील मोठी आपटी ही जवळपास दोन महिन्यातील सर्वाधिक राहिली.

प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलर आता वर्षभराच्या भक्कम स्थानी आहे. परिणामी आता व्याजदर वाढविण्यास हरकत नाही, असे संकेत फेडरल रिझव्‍‌र्हच्या अध्यक्षांनी अमेरिकी सिनेटला बुधवारी दिले. डॉलरसमोर भारतीय रुपयासह अनेक आशियाई चलन सध्या तीव्र स्वरूपाची घसरण नोंदवीत आहेत. रुपयाच्या मूल्याची घसरण दुहेरी तुटीत भर घालणारी आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक  ठरली आहे.

Web Title: Rupee continues its free fall against us dollar
First published on: 20-07-2018 at 01:43 IST