मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात सलग चौथ्या सत्रात तेजीचे वातावरण असताना, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात पडझड कायम असून, बुधवारी त्याने ८३ रुपयांपुढील ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली. भारताचे चलन डॉलरच्या तुलनेत सत्रात ६१ पैशांनी गडगडले. 

जगातील प्रमुख परदेशी चलनाच्या तुलनेत डॉलरच्या सशक्ततेने रुपयाच्या मूल्यावर ताण आणला आहे.

डॉलरच्या तुलनेत घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने चलन बाजारात डॉलरची विक्री करून वेळोवेळी हस्तक्षेप केला आहे. परिणामी तिच्याकडील परकीय गंगाजळीत जानेवारी-सप्टेंबर २०२२ या कालावधीमध्ये सुमारे १०१ अब्ज डॉलरने घसरण झाली आहे. मात्र तरी देशाकडील परकीय चलनसाठा ५३३ अब्ज डॉलरवर कायम (पान १० वर) (पान ५ वरून) आहे. बाह्य प्रतिकूल घटनांचा आघात आणि जोखमीचा सामना  करण्यासाठी भारताकडे पुरेशी परकीय चलन गंगाजळी आहे, असा निर्वाळा जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्ज’ने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे.

देशाकडे ८ ते ९ महिने आयात समतुल्य परकीय चलन गंगाजळी उपलब्ध आहे. याआधी २०१३ मध्ये गंगाजळी ६.५ महिने आयात समतुल्य पातळीपर्यंत घसरली होती.

कारण काय?

आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या पुन्हा कडाडत असलेल्या किमती, परिणामी आयातदारांकडून डॉलरची वाढती मागणी, त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवली बाजारातून सुरू असलेल्या विक्रीने रुपया उत्तरोत्तर नवीन तळाकडे चालला आहे.

नीचांकी तळ.. बुधवारच्या आंतरबँक चलन विनिमय मंचावर रुपयाने ८२.३२ या मजबूत पातळीवर व्यवहाराला सुरुवात केली. मात्र नंतरच्या सत्रात त्यातील घसरण निरंतर वाढत गेली आणि सत्रअखेरीस ६१ पैशांची तूट दर्शवत त्याने ८३.०१ अशा सार्वकालिक नीचांकी पातळीला स्पर्श केला.