सहारा समूहातील दोन कंपन्यांमध्ये ठेव स्वरूपातील गुंतवणुकीच्या परतफेडीला भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने मंगळवारपासून सुरुवात केली.
या प्रकरणातील गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळणे सुलभ व्हावे यासाठी सेबीने आपल्या वेबस्थळावर चार पानी अर्जाचा नमुना दिला आहे. त्या योगे गुंतवणूकदारांना त्यांची वैयक्तिक माहिती देण्याचे आवाहन सेबीने केले आहे. अर्जाद्वारे परतफेडीचा दावा करणाऱ्या गुंतवणूकदारांची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर, रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असे सेबीने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या हवाल्याने सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहातील दोन कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून उभा केलेला सुमारे २५,००० कोटींचा निधी बेकायदेशीर असल्याचा निर्णय देतानाच, ही रक्कम सेबीकडे परतफेडीसाठी सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. सहारा समूहाने यापैकी रु. ५१०० कोटी सेबीकडे जमा केले असून, उर्वरित निधी गुंतवणूकदारांना परत केल्याचा दावा केला आहे. सहाराच्या या दाव्याच्या सत्यासत्यतेचा निर्णय लागण्याआधी जमा केलेला निधी पात्र गुंतवणूकदारांमध्ये ताबडतोबीने वितरीत करण्याची जबाबदारी न्यायालयाने सेबीवर सोपविली आहे.