गेल्या सलग सात व्यवहारांतील निर्देशांक तेजी कायम राखताना भांडवली बाजार निर्देशांक मंगळवारी नवीन विक्रमी टप्प्यावर विराजमान झाले. फायझरच्या करोना प्रतिबंधक लस चाचणीच्या उत्साही परिणामांच्या घोषणेने जागतिक बाजारात चैतन्य पसरले. त्याचेच अनुसरण करीत सेन्सेक्सनेही इतिहासात प्रथमच ४३ हजारांपुढे झेप घेतली, तर निफ्टीने १२,६०० पुढील टप्पा पहिल्यांदाच अनुभवला.

सलग दुसऱ्या सत्रात दोन्ही निर्देशांकांनी सार्वकालिक उच्चांकी टप्पा नोंदविला आहे. तर बाजारात निर्देशांकांची सलगपणे सात व्यवहारसत्रांत सुरू राहिलेली ही घोडदौड आहे. सेन्सेक्सने गेल्या सात व्यवहारांत मिळून ३,६६० अंशांची भर टाकली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६८०.२२ अंशांची झेप घेत ४३,२७७.६५ या पातळीवर दिवसाचे व्यवहार थंडावले तेव्हा स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७०.०५ अंशवाढीने १२,६३१.४४ या पातळीवर जाऊन थांबला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांची सत्रात अनुक्रमे ४३,३१६.४४ अंश, तर १२,६४३.९०  अशा उच्चांकांना गवसणी घातली. टक्केवारीत मुंबई निर्देशांकाची वाढ १.६० टक्के, तर निफ्टीची तुलनेत कमी १.३६ टक्के अशी राहिली.

सोमवारच्या ऐतिहासिक टप्प्यानंतर तेजीसह सुरू झालेल्या भांडवली बाजारात मंगळवारी दुपापर्यंत निर्देशांक वेगवान उसळी नोंदवीत होते. मध्यान्हापूर्वीच दोन्ही निर्देशांकांनी अनुक्रमे ४३ हजार व १२,६०० निर्णायक उच्चांकी स्तर मागे टाकले.

सेन्सेक्समध्ये पुन्हा बँक, वित्त क्षेत्रातील समभागांना मागणी  दिसून आली. यामध्ये बजाज फायनान्स सर्वाधिक ८.८४ टक्क्यांपर्यंत वाढला. तसेच इंडसइंड बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, एचडीएफसी लिमिटेड, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक यांचा उल्लेख करावा लागेल, तर तेजीच्या बाजारात माहिती तंत्रज्ञान तसेच औषधनिर्माण क्षेत्रातील अन्य कंपन्यांच्या समभागांवर गुंतवणूकदारांच्या नफेखोरीपोटी विक्री दबाव दिसून आला. त्यासह नेस्ले इंडिया वगैरे काही समभाग ५.७३ टक्क्यांपर्यंत घसरले.

फायझरच्या समभाग मूल्यात तेजी

फायझरने कोविडवरील प्रतिबंधात्मक लशीची मानवी चाचणी यशस्वी केल्याचे जाहीर केल्याचा सकारात्मक परिणाम भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपनीच्या समभागांवर मंगळवारी दिसून आला. समभागाचे मूल्य व्यवहारात थेट २० टक्क्यांपर्यंत झेपावले. त्याचा मंगळवारचा स्तर ५,९०० रुपये असा सार्वकालिक उच्चांकी राहिला. तर सत्रअखेर भांडवली बाजार बंद होताना सोमवारच्या तुलनेत त्यात २.६६ टक्के भर पडून तो ५,०४८.४५ रुपयांवर स्थिरावला.