मुंबई : वित्त आणि बँकिंग क्षेत्रात सोमवारच्या सत्रात आलेल्या तेजीनंतर गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्यामुळे मंगळवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांकात घसरण झाली. जागतिक पातळीवर रशिया-युक्रेनमधील वाढता विसंवाद आणि खजिन तेलाचे दर पुन्हा भडकल्याने गुंतवणूकदारांनी वरच्या भावात समभाग विकून नफा पदरी पाडून घेण्याला प्राधान्य दिले.
दिवसअखेर सेन्सेक्समध्ये ४३५.२४ अंशांच्या घसरणीसह ६०,१७६.५० पातळीवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये ९६ अंशांची घसरण झाली आणि तो १७,९५७.४० पातळीवर स्थिरावला.
जागतिक नकारात्मक संकेतामुळे मंगळवारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत नफावसुलीला प्राधान्य दिल्याने प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. मात्र मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात सकारात्मक कल कायम असून गेल्या ५ ते ६ महिन्यांच्या समभागातील घसरणीनंतर या श्रेणीतील समभाग आकर्षक पातळीवर आहेत.