मुंबई : भांडवली बाजाराने शुक्रवारी जोरदार पुनरागमन करताना, आधीच्या सत्रातील तीव्र स्वरूपाची घसरण बऱ्यापैकी भरून काढली. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी चीनने व्याजदरात कपात केल्यानंतर मुख्यत: आशियाई बाजारातील निर्देशांकांनी घेतलेल्या फेरउसळीचे पडसाद म्हणून, स्थानिक बाजारात धातू आणि औषधी निर्माण क्षेत्रातील समभागांत खरेदीचा उत्साह दिसल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये १,५३४ अंशांची भर पडली. 

निर्देशांकात वजनदार स्थान असणाऱ्या रिलायन्स आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांनी शुक्रवारच्या व्यवहारात कमावलेल्या दमदार मागणीमुळे निर्देशांकाला मोठय़ा मुसंडीचे बळ मिळाले. दिवसअखेर निर्देशांक सेन्सेक्समध्ये १,५३४.१६ अंशांची म्हणजेच २.९१ टक्क्यांची भर घालत ५४,३२६.३९ पातळीवर बंद झाला. सत्रादरम्यान १,६०४.२ अंशांची झेप घेत ५४,३९६.४३ अंशांची उच्चांकी पातळीही या निर्देशांकाने गाठली होती. तर निफ्टीने ४५६.७५ अंशांची (२.८९ टक्के) कमाई केली आणि तो १६,२६६६.१५ पातळीवर स्थिरावला.

जागतिक पातळीवरील प्रमुख देशांच्या भांडवली बाजारातील तेजीचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले. परिणामी देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी सकाळपासून समभाग खरेदीचा सपाटा लावला होता. जगभरात इतरत्र वाढत्या महागाईला चाप लावण्यासाठी मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरवाढ केली जात आहे. तर चीनच्या मध्यवर्ती बँकेने विकासाला चालना देण्यासाठी व्याजदरात कपात केल्याने आशियातील उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये तेजीमय वातावरण आणि निर्देशांकांमध्ये उसळी दिसून आली, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये सामील सर्वच ३० कंपन्यांचे समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाले. विशेषत: डॉ. रेड्डीज, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, नेस्ले, लार्सन अँड टुब्रो, अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, सन फार्मा, स्टेट बँक आणि एचडीएफसीचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. परदेशी गुंतवणूकदारांकडून अखंडपणे समभाग विक्रीचा मारा सुरूच असून गुरुवारच्या सत्रात त्यांनी ४,८९९.९२ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

दोन महिन्यांतील सर्वोत्तम सप्ताह

निर्देशांक मागील काही दिवसांतील सलगपणे सुरू असलेल्या पडझडीतून सावरले इतकेच नाही, तर त्यांच्यासाठी हा मागील दोन महिन्यांत सर्वोत्तम कमाईचा सप्ताह ठरला. साप्ताहिक आधारावर, सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी अनु्क्रमे १,५३२.७७ अंश आणि ४८४ अंशांची वाढ दर्शविली आहे. याआधी सलग पाच आठवडे हे निर्देशांकांसाठी तोटय़ाचे राहिले आहेत.