आजवरची एका दिवसातील सर्वात मोठय़ा गटांगळीतून सावरत, मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी दमदार उभारी दर्शविली. जागतिक भांडवली बाजारातील सकारात्मकता आणि देशातही सरकारकडून करोना विषाणूच्या महासाथीमुळे झालेले नुकसानीचे परिमार्जन करणारे आर्थिक उपाय जाहीर होतील या आशेने बाजारात झालेल्या उत्साही खरेदीचा परिणाम दिसून आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ६९२.९७ अंशांची वाढ दर्शवून २६,६७४.०३ पातळीवर मंगळवारी व्यवहार आटोपले तेव्हा स्थिरावला. तर निफ्टी निर्देशांकाने तांत्रिकदृष्टय़ा अतिमहत्त्वाच्या ७,८०० पातळीपुढे १९०.८० अंशांच्या उसळीसह दिवसअखेर विश्राम घेतला. सोमवारी दोन्ही निर्देशांकांनी तब्बल १३ टक्क्य़ांची इतिहासातील सर्वात मोठी आपटी अनुभवली आहे.

अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हने अर्थव्यवस्थेला सावरण्याठी अमर्याद रोखे खरेदीचा कार्यक्रम जाहीर केला. त्या परिणामी मंगळवारी आशियाई बाजारांनी सकारात्मक फेर धरलेला दिसून आला. त्यानंतर खुल्या झालेल्या भारताच्या भांडवली बाजारातही गुंतवणूकदारांनी याच सकारात्मकतेचे अनुकरण करीत, उत्साहाने समभाग खरेदी केली. ज्याचा सर्वाधिक लाभ इन्फोसिस, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, मारुती, एचसीएल टेक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या सोमवारी सपाटून मार खाणाऱ्या समभागांना झाला. त्या उलट, महिंद्र, इंडसइंड बँक, आयटीसी, पॉवरग्रिड आणि लार्सन अँड टुब्रो हे तेजीच्या बाजारातही घसरणीत राहिलेले समभाग ठरले.

तथापि मंगळवारच्या व्यवहारात, सेन्सेक्सने १,४८० अंशांच्या उसळीसह २७,४६२.८७ या दिवसांतील उच्चांकापर्यंत मजल मारली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर सक्तीच्या बंदीच्या जाचातून दिलासा देईल अशा काही उपायांची आणि नियमांत शिथिलता आणणाऱ्या घोषणा केल्या. परंतु कर-कपातीसह, अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणाऱ्या घोषणा नसल्याने बाजाराचा अपेक्षाभंगही झाला. त्यामुळे सेन्सेक्स उच्चांकावरून जवळपास ८०० अंश निर्देशांक घरंगळत आला तरी दिवसाची अखेर मात्र त्याने सकारात्मक राखली.

Web Title: Sensex gains 194 points abn
First published on: 25-03-2020 at 00:09 IST